मालमत्ता कर थकला, मनपाकडून सहा व्यावसायिक मालमत्ता सील
Property tax due, Municipal Corporation seals six commercial properties
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
महापालिकेने मालमत्ता कर वसुलीची धडक मोहीम हाती घेतली आहे. व्यावसायिक मालमत्ताधारकांकडे थकलेली लाखो रुपयांची थकबाकी वसुलीसाठी कारवाई सुरू केली आहे. झोन क्रमांक १, २, ६, ७ आणि ९ कार्यालयांतर्गत असलेल्या सहा मालमत्तांवर बुधवारी (दि.४) जप्तीची कारवाई करण्यात आली. यासह एका शासकीय कार्यालयावरही कारवाई करण्यात आल्याची चर्चा आहे.
महापालिकेने मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या मालमत्तांना सील ठोकण्याची कारवाई हाती घेतली आहे. शहरातील अनेक मालमत्ताधारकांकडे कोट्यवधी रुपयांचा कर थकलेला आहे. कर वसुलीसाठी दोनवेळा सवलत जाहीर करूनही मालमत्ताधारक कर भरण्याकडे टाळाटाळ करत आहे. मार्च महिना सुरू झाला असून, कराच्या वसुलीसाठी थेट सील आणि जप्तीची कारवाई हाती घेण्यात आली आहे.
दरम्यान, बुधवारी झोन क्रमांक १, २, ६, ७ आणि ९ कार्यालयांतर्गत मालमत्ताधारकांकडील कर वसुलीकडे अधिक लक्ष देण्यात आले आहे. यात दोन लाख ९० हजारांचा कर थकीत असल्याने धनंजय लाहोटी यांचे वेदांतनगर येथील लाभ चेंबरमधील दुकान क्रंमाक ५ ला सील ठोकले, तर खोकडपुरातील मनोहर शेजूळ यांच्याकडे १ लाख ५७ हजार २१६ रुपयांचा कर थकल्याने मालमत्ता जप्त केली.
तसेच शैलेश जाधव यांच्याकडे २३ लाख २१ हजार २८४ रुपये कर थकल्याने जयभवानीनगर येथील त्यांच्या मालकीच्या चार दुकानांना सील ठोकण्यात आले. यासह ६ लाख ४३ हजारांचा कर थकल्याप्रकरणी जुना बाजार भागातील सय्यद किरणा या दुकानावर जप्तीची कारवाई करण्यात आली. तर सिटी चौक येथील अहेमद फते मोहमंद यांच्याकडे ८ लाख ८४ हजार ८५६ रुपयांचा मालमत्ता कर थकला आहे. त्यापोटी मनपा पथकाने त्यांची मालमत्ता जप्त केली. याशिवाय शिवाजीनगर येथील अंलकार हेअर सलूनच्या मालकाकडे १ लाख ३७ हजारांची थकबाकी असल्याने दुकानाला सील ठोकण्यात आले.
शासकीय कार्यालयावरही कारवाई ?
थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी महापालिकेकडून मोहीम सुरू करण्यात आली आहे. दोन दिवसांत मनपाच्या पथकाने आठ ते नऊ व्यावसायिक मालमत्ता सील केल्या आहेत. या कारवाईवेळी पथकाने १ लाख ४८ हजार ६७० रुपयांचा थकीत कर न भरल्याने न्यू पहाडसिंगपुरा येथील शासकीय कार्यालयावरही कारवाई केल्याची चर्चा आहे.

