डिपेक्समध्ये राज्यभरातील ४०० हून अधिक प्रकल्पांचे प्रदर्शन
More than 400 projects from across the state showcased at Deepex
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : तंत्रज्ञानाच्या या महाकुंभात तरुणाईच्या नवकल्पनांना नवी भरारी मिळत असून, मडिपेक्स-२०२६फच्या माध्यमातून राज्यभरातील ४०० हून अधिक प्रकल्पांचे भव्य प्रदर्शन गुरुवारी (दि.५) एमआयटी परिसरात भरवण्यात आले आहे. इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांच्या हस्ते या राज्यस्तरीय प्रकल्प प्रदर्शनाचे अत्यंत शानदार वातावरणात उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि अंतराळ क्षेत्रातील नव्या संधींकडे युवकांचे लक्ष वेधत, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशाच्या विकासात सक्रिय योगदान देण्याचे मोठे आवाहन केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), सृजन ट्रस्ट, महाराष्ट्र शासनाचा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि एमआयटी यांच्या संयुक्त विद्यमाने ५ ते ८ मार्च २०२६ या कालावधीत हे चार दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आणि तांत्रिक कौशल्यांना प्रोत्साहन देणे, हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे.
या उद्घाटन सोहळ्याला स्वागत समितीचे अध्यक्ष तथा मंत्री अतुल सावे, अभाविपचे राष्ट्रीय संघटन मंत्री आशीष चौहान, स्वागत समिती कार्याध्यक्ष मुनीष शर्मा, सचिव डॉ. अनंत पंढरे, अभाविप प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. सुरेश मुंढे, प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज ननवरे, डिपेक्स २०२६ चे निमंत्रक कनक कावडीवले आणि देवगिरी प्रदेश सहमंत्री दीपाली चित्ते यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकात डॉ. अनंत पंढरे यांनी डिपेक्सची परंपरा आणि उद्दिष्टे स्पष्ट केली. मविकसित भारत २०४७फचे स्वप्न साकारण्यासाठी युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची प्रेरणा निर्माण होते, असे मंत्री अतुल सावे यांनी यावेळी नमूद केले.
भविष्यात एआय, अंतराळ क्षेत्रात मोठ्या संधी : डॉ. सोमनाथ
विद्यार्थ्यांनी जागतिक घडामोडी आणि तंत्रज्ञानातील वेगाने होणाऱ्या बदलांचे सतत निरीक्षण करावे, असा कानमंत्र डॉ. एस. सोमनाथ यांनी दिला. ते म्हणाले की, युद्ध, भू-राजकीय परिस्थिती आणि जागतिक आर्थिक बदलांचा विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रावर मोठा प्रभाव पडत आहे. भारत आज जागतिक अर्थव्यवस्थेत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. पुढील काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) स्वयंचलन तंत्रज्ञान, डिजिटल अर्थव्यवस्था, आरोग्य, कृषी आणि अंतराळ क्षेत्रात अफाट संधी उपलब्ध होणार आहेत. वाढती लोकसंख्या आणि हवामान बदलासारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी विद्यार्थ्यांनी संशोधनवृत्ती जोपासून नावीन्यपूर्ण प्रकल्प समाजाच्या उपयोगासाठी आणावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

