

छत्रपती संभाजीनगर : स्वतःच्या बहिणीच्या घरात गेल्या १५ वर्षांपासून राहणाऱ्या सख्ख्या भावाने आणि भावजयीने मालमत्तेच्या वादातून गच्चीवर घाण करतात या क्षुल्लक कारणावरून आणि घर रिकामे करायला सांगितल्याच्या रागातून त्यांनी बहिणीच्या दोन लहान पाळीव श्वान पिल्लांना (कुत्र्यांना) शस्त्राने वार करून ठार मारले. ही घटना २३ ते २६ ऑगस्ट दरम्यान नारळीबाग भागात घडली. या प्रकरणी सिटी चौक ठाण्यात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शामराव शेनफडू शेलार आणि रुखमनबाई शामराव शेलार अशी आरोपीची नावे आहेत.
फिर्यादी कौशल्याबाई गंगाधर लोखंडे (६५, रा. नारळीबाग) यांच्या तक्रारीनुसार, त्यांची स्वतःची तीन मजली इमारत आहे. त्यांनी त्यांच्या गच्चीवर 'रॉकी' (वय अडीच महिने) आणि 'क्युटी' (वय साडेतीन महिने) या दोन लहान श्वानांच्या पिल्लांना पाळले होते. याच इमारतीतील ४ खोल्यांमध्ये कौशल्याबाई यांचा सख्ख्खा भाऊ शामराव शेलार आणि भावजय रुखमनबाई हे गेल्या १५ वर्षांपासून विनामूल्य राहतात.
काही दिवसांपूर्वी कौशल्याबाई यांनी भावाला घर रिकामे करण्यास सांगितले होते, त्यावरून दोन्ही कुटुंबांत वाद झाला होता. घरातील भाडेकरूंनी २३ ऑगस्ट रोजी कौशल्याबाई यांना सांगितले होते की, तुमचा भाऊ आणि भावजय कुत्र्यांच्या गच्चीवर घाण करण्यावरून त्रस्त आहेत आणि त्यांना एक दिवस मारून टाकू अशी धमकी देत आहेत.
मंगळवारी (दि. २५) रात्री ११ वाजेच्या सुमारास कौशल्याबाई यांच्या पतीने दोन्ही पिल्लांना जेवण देऊन गच्चीवर दोरीने बांधले आणि ते खाल झोपायला आले. मात्र, बुधवारी (दि. २६) सकाळी ७ वाजता ते गच्चीवर गेले असता, दोन्ही पिल्ले शस्त्राच्या घावाने रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडलेली आढळून आली. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार राजेश शिंदे करत आहेत.