

छत्रपती संभाजीनगर - शहरात वाढते प्राणांतिक अपघात आणि त्यात जाणारे निष्पाप बळी रोखण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांनी अखेर 'हेल्मेट सक्त्ती'ची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. गुरुवारी (दि. २७) सकाळी अचानक राबवलेल्या विशेष मोहिमेत अवघ्या चार तासांत विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या तब्बल १ हजार १३० वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत नियम मोडणाऱ्यांकडून ११ लाख ३० हजाराचा दंड आकारण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त सुभाष भुजंग यांनी दिली.
शहरात जानेवारी ते मे २०२६ या अवघ्या पाच महिन्यांत तब्बल २४४ जणांना रस्ते अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. या मृतांमध्ये सुमारे ६० टक्के प्रमाण हे केवळ दुचाकीस्वारांचे असून, त्यात १८ ते ४१ वयोगटातील तरुणांची संख्या सर्वाधिक आणि चिंताजनक आहे.
अपघातांची ही भयंकर आकडेवारी पाहता, प्राणांतिक अपघात कमी करण्यासाठी जून महिन्यातच पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि आरटीओसोबत विशेष बैठक घेतली होती. तेव्हाच हेल्मेट सक्तीचे संकेत देण्यात आले होते. त्याची सुरुवात शासकीय कार्यालयांमधून करण्यात आली. तसेच, नागरिकांनाही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हेल्मेट वापरण्याचे आवाहन करण्यात आले होते.
मोहीम अधिक कडक होणार
नागरिकांनी केवळ पोलिसांच्या दंडापासून वाचण्यासाठी हेल्मेटचा वापर करू नये, तर ते स्वतःच्या अमूल्य जिवाच्या रक्षणासाठी आहे. यापुढेही शहरात विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांविरुद्धची मोहीम अधिक तीव्र आणि कडक केली जाणार आहे. स्वतःचा जीव धोक्यात न घालता सर्व दुचाकीचालकांनी हेल्मेटचा नियमित वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
पोलिसांनी धडाका लावला
दोन महिन्यांनंतरही अनेक दुचाकीचालक पोलिसांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करून बिनधास्तपणे विना हेल्मेट वाहने चालवत असल्याचे निदर्शनास आले. विना हेल्मेट दुचाकी चालवताना अपघात झाल्यास डोक्याला गंभीर मार लागून जागीच मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या आहेत. या प्राणहानीला आळा घालण्यासाठीच वाहतूक शाखेने गुरुवारी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत संपूर्ण शहरात अचानक मोठी मोहीम राबवून कारवाईचा बडगा उगारला. ही मोहीम पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त शर्मिष्ठा घारगे वालावलकर आणि वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुभाष भुजंग यांच्या थेट मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. वाहतूक शाखेच्या पोलिस निरीक्षक रेखा लोंढे, मंगेश जगताप, पवन चौधरी, सहायक निरीक्षक रविकांत गच्चे आणि सचिन मिरधे यांनी आपापल्या पथकातील अधिकारी व अंमलदारांसह थेट रस्त्यावर उतरून ही कारवाई केली.