

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी २७ ऑगस्ट रोजी आंतरवली सराटी ते मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या महामोर्चासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार तयारी सुरू आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या ऐतिहासिक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठका वेग घेत आहेत.
रविवारी (दि. २४) सकाळी बीड बायपास परिसरातील एका लॉन्समध्ये देवळाई सातारा व संपूर्ण बायपास परिसरातील सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई दौऱ्याचे सविस्तर नियोजन करण्यात आले. मोर्चात सामील होण्यासाठी देवळाई सातारा व बीड बायपास परिसरातून १० ट्रॅव्हल्स आणि १०० चारचाकी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
समाजबांधवांना रेनकोट, छत्री व किमान १५ दिवस पुरेल इतके रेशन सोबत नेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या बैठकीस विविध मराठा संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, सर्वपक्षीय नेते, महिला भगिनी आणि मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव उपस्थित होते. मचलो मुंबईफया हाकेला सकारात्मक प्रतिसाद देत, समाजाने एकजुटीने आरक्षणाच्या लढ्यासाठी सज्ज राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.