

Preparations in full swing in small Pandharpur on the occasion of Ashadhi Ekadashi
वाळूज महानगर, पुढारी वृत्त-सेवा : आषाढी एकादशीनिमित्त छोट्या पंढरपुरात दर्शनासाठी येणारे भाविक तसेच दिंड्यामधील वारकऱ्यांच्या स्वागतासाठी मंदिर समिती व प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. याचबरोबर विठ्ठल-रुक्मिणी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
या वर्षी आषाढी एकादशी सुटीच्या दिवशी रविवारी (दि.६) आली असल्याने छोट्या पंढरपुरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त राहणार आहे. भाविकांना व्यवस्थितपणे दर्शन घेता यावे यासाठी मंदिर विश्वस्त मंडळ तसेच पोलीस प्रशासनाने विविध उपाययोजना आखल्या आहेत.
शहरापासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर खामनदीच्या तिरावर छोटे पंढरपूर वसलेले आहे. या ठिकाणी भव्य दिव्य विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर उभारण्यात आले असून, दरवर्षी आषाढी एकादशीला लाखो वारकरी विठू नामाचा गजर व हरिनामाचा जयघोष करीत पायी दिंड्या तसेच पालखीद्वारे दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होत असतात.
यावर्षी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पंढरपूर येथील तिरंगा चौकापासून दोन ऐवजी या वर्षी तीन दर्शन रांगा, तिरंगा चौक ते कामगार चौकदरम्यान हॉकर्स झोनला (दुकाने लावण्यास) तसेच शुभेच्छा होल्डिग बॅनर लावण्यास बंदी, मंदिर तसेच मंदिर परिसरात सध्या ३२ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत.
गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांवर नजर ठेवण्यासाठी मुख्य रस्त्यावर ३५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शिवाय भाविकांसाठी शुद्ध पिण्याचे पाणी, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र सार्वजनिक शौचालय, तीन ठिकाणी चप्पल-बूट स्टॅन्ड, आपत्कालीन व्यवस्था, पोलिस मदत केंद्र आदी सुविधा भाविकांसाठी राहणार आहे. याच बरोबर एएस क्लब चौक, कामगार चौक, आंबेडकर चौक, कार्तिकी हॉटेल, महावीर चौक, तिरंगा चौक, जुना रांजणगाव रस्ता (नेहा हॉस्पिटल), पंढरपूर मंदिर परिसर आदी ठिकाणी ब्लॉकिंग पॉइंट लावण्यात येणार आहेत.