

Pramod Padaswan murder case
छत्रपती संभाजीनगर : जागेच्या वादातून निघृण हत्या झालेल्या प्रमोद पाडसवान यांच्या आईसह पत्नी मुलाचे पोलिसांनी सोमवारी (दि. २५) जबाब नोंदवले. त्यामध्ये कुटुंबीयांनी आरोपी गौरव काशीनाथ निमोणे, ज्ञानेश्वर काशीनाथ निमोणे, शशिकला काशीनाथ निमोणे, सौरव काशीनाथ निमोणे, काशीनाथ निमोणे आणि जावई मनोज दानवे यांच्या व्यतिरिक्त आणखी काही नवीन नावे दिली आहेत. दरम्यान पोलिसांनी आणखी तीन संशयीत आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत. यामध्ये निमोणेचा एक नातेवाईक, गणेश मंडळाचा एक पदाधिकारी व अन्य एकाचा समावेश असल्याचे सुत्रानी सांगितले आहे.
सिडको एन-६ भागातील संभाजी कॉलनीत शुक्रवारी (दि. २२) दुपारी एक वाजेच्या सुमारास दहशत निर्माण करणारे निमोणे कुटुंबातील सहा जणांनी मिळून पाडसवान कुटुंबावर खुनी हल्ला करून प्रमोद यांची निघृण हत्या केली होती. या हल्ल्यात प्रमोद यांचे वडील रमेश हे गंभीर जखमी झाले आहेत. तर त्यांचा मुलगा रुद्र व आई मंदाबाईही जखमी झाले होते. सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर निमोणे कुटुंबातील सहाही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. मात्र कुटुंबातील सदस्य व प्रत्यक्षदर्शीचे जबाब नोंदविणे राहिले असल्याने सोमवारी पोलिसांनी प्रक्रिया पुन्हा सुरू केली. कुटुंब व घटनास्थळी असलेल्या काही प्रत्यक्षदर्शीच्या जबाबानुसार तपास केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, रविवारी रात्रीच पोलिस निरीक्षक संभाजी पवार, गजानन कल्याणकर, शिवचरण पांढरे यांनी घटनास्थळ पंचनामावेळी केवळ एकट्या गौरव निमोणेला सोबत आणले होते. घराची झडती
घेऊन धारदार चाकू, लाकडी दांडे, २ लोखंडी रॉड, एक लोखंडी पहार व चाकूचे दोन कव्हर जप्त करण्यात आले आहे. चाकूचे दोन कव्हर असल्याने आता दुसऱ्या चाकूचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान, निमोणे कुटुंबाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले रमेश पाडसवान यांची प्रकृती अजूनही जैसे थे आहे. त्यांच्या डोक्याला, कानाला, पाठीला व हाताला गंभीर दुखापत आहे. मुलाच्या मृत्यूच्या वृत्ताने ते सुन्न झाल्याने मानसिक धक्क्यात आहेत.
प्रमोद यांची हत्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्यात निमोणे कुटुंबातील सदस्यांनी कशाप्रकारे पाडसवान कुटुंबावर खुनी हल्ला चढवला हे दिसून येत आहे. या फुटेजचे विश् लेषण सायबर पोलिसांकडून केले जात आहे. घटनास्थळी या हल्लेखोरांशिवाय आणखी कोणी आरोपींना मदत करताना दिसते का, हेही
तपासले जात आहे. आरोपी तिन्ही निमोणे बंधूंना त्यांची आई शशिकलाने चाकू आणून दिल्याचा उल्लेख आहे. सीसीटीव्हीत गौरव हा प्रमोद यांच्या पाठीत सलग अनेकवेळा चाकू खुपसताना दिसत आहे. प्रमोदचे वडील रमेश यांच्यावरही सहा आरोपींनी हल्ला केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. रुद्रच्या छातीत वार आहे. त्यामुळे सर्व भक्कम पुरावे पोलिसांकडून जमा केले जात आहेत.
निमोणेच्या दहशतीचा पाढाच कुटुंबीय, कॉलनीतील लोकांनी पोलिस व नेत्यांसमोर वाचून दाखविला. या हत्याकांडामुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे निमोणेला मदत करणाऱ्यांची जबाबात नावे समोर आली तर त्यांनाही आरोपी केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच जे घटनेनंतर परिसरातून गायब आहेत त्यांचा याच्याशी काही संबंध आहे का? घटनास्थळी ते उपस्थित होते का? याचाही पोलिस तपास करत आहेत. निमोणे बंधूंच्या सोशल मीडिया प्रोफाइल, फोटो, व्हिडिओही सायबर पोलिसांनी तपासून आरोपी कोणत्या ग्रुपमध्ये होते? मित्र कोण आहेत? काय करत होते? अशी सर्व माहिती गोळा केली आहे.
पाडसवान कुटुंबाने तीन वर्षांत सिडको पोलिस ठाण्यात निमोणेविरुद्ध ३० तक्रारी देऊनही पोलिसांनी कारवाई न केल्याने निमोणेची मजल खुनापर्यंत गेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. त्यामुळे हा गुन्हा एमआयडीसी सिडको पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पोलिस आयुक्तांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपासासाठी तीन अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापन केली. यामध्ये गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार, एमआयडीसी सिडकोचे निरीक्षक गजानन कल्याणकर आणि सायबरचे निरीक्षक शिवचरण पांढरे यांचा समावेश आहे. या तिन्ही अधिकाऱ्यांनी तपासाला गती दिली आहे. कामाची विभागणी करून प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या विभागातून घेतल्या आहेत. दररोज सायंकाळी पोलिस आयुक्त प्रवीण पवार हे तपासाचा आढावा घेत आहेत.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त सेवा: संभाजी कॉलनी येथील प्रमोद पाडसवान यांच्या हत्येचा तपास एसआयटीमार्फत करण्यात यावा. तसेच आरोपींविरोधात मोक्काअंतर्गत कठोर कारवाई करून खटला जलद गती न्यायालयात चालवावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
दानवे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना याबाबत पत्र लिहिले आहे. यात म्हटले आहे की, निमोणे कुटुंबाकडून पाडसवान कुटुंबीयांचा सातत्याने छळ होत होता. यासंदर्भात स्थानिक पोलिस स्थानकांत वारंवार तक्रारी केलेल्या होत्या. मात्र स्थानिक पोलिस यंत्रणेने योग्य ती दखल न घेता अनाकलनीय विलंब केल्यामुळे २२ ऑगस्ट रोजी प्रमोद पाडसवान यांची निघृण हत्या झाली. संभाजी कॉलनी येथील प्रमोद पाडसवान यांच्या हत्येचा तपास विशेष पथकाद्वारे (एसआयटी) करावा आणि आरोपींविरोधात मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करून खटला जलद गती न्यायालयात चालवावा, अशी मागणी दानवे यांनी या पत्राद्वारे केली आहे.
सदर घटना ही केवळ एका कुटुंबावर झालेली क्रूर अन्यायकारक हिंसा नसून, पोलिस प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारींना वेळेत व गांभीर्याने दखल न घेण्यामुळे उद्भव-लेला कायदा व सुव्यवस्थेवरील गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे चालढकल करणाऱ्या संबंधित व अधिकारी जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे दानवे म्हणाले.
पाडसवान कुटुंबीयांनी केलेल्या सर्व तक्रारींची मूळ नोंद तपासात समाविष्ट करून, पोलिस प्रशासनाने कारवाई का केली नाही, याची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी. जाणीवपूर्वक निष्क्रियता व टाळाटाळ केलेल्या संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगविषयक, प्रशासकीय व दंडात्मक कारवाई करण्यात यावी. निमोणे कुटुंबाच्या अतिक्रमण, बेकायदेशीर कृती व त्यांना मिळालेल्या राजकीय आश्रयाबाबत चौकशी करून कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणीही दानवे यांनी केली आहे.