

Prakash Mahajan
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. "कमीतकमी अपेक्षा ठेवून माझ्या वाटयाला उपेक्षा आली. गंगेला बोल लावला तेव्हाच, खरंतर मी थांबायला हवं होत. मला वैयक्तिक कोणतीही अपेक्षा नव्हती किंवा पदाची इच्छा देखील नव्हती. फक्त हिंदुत्वाचा विचार जोपासला जावा ही अपेक्षा होती," अशी नाराजी महाजन यांनी व्यक्त केली. महाजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये राज ठाकरेंना मोठा धक्का असल्याचे समजले जाते.
मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी आज (दि. १३) आपल्या पदाचा राजीनामा दिला. गेल्या अनेक दिवसांपासून ते पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. काही दिवसांपूर्वी ते मुंबईत आले होते, त्यावेळी त्यांना अमित ठाकरे भेटले होते. त्यांनी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता.
माध्यमांशी बोलताना महाजन म्हणाले की, "आज मी समोर आलो आहे, कारण कुठे तरी आपण थांबलं पाहिजे ही भावना येत आहे. व्यक्तिगत माझी अपेक्षा कमी आहे. कोणत्याही पक्षात मी राहिलो तर मला कोणत्याही पदाची आणि निवडणुकीच्या तिकिटाची अपेक्षा नव्हती. मी हिंदुत्वासाठी काम करत होतो. पण माझ्या वाटेला उपेक्षा आली. मला विधानसभेला फक्त प्रचाराला वापरून घेतले. मी अमितजी यांचा थोडा अपराधी आहे, की मी त्यांना शब्द दिला होता की मी तुमच्यासोबत काय तुमच्या मुलासोबत ही काम करेल. असंख्य मनसैनिकांनी माझ्यावर प्रचंड प्रेम दिले, त्यांचा मी ऋणी राहील. या मनोरुग्ण परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी मी थांबत आहे," असे महाजन यांनी म्हटलं आहे.