

Paithan Two-wheeler car accident, one dead
पैठण, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर-पैठण रोडवरील कातपूर फाट्याच्या कॅनलजवळ बुधवारी (दि.१०) रात्री दुचाकी व कारच्या अपघातात वकिलाचे पती ठार झाल्याची दुर्देवी घटना घडली असून, अपघात होताच कारचालक फरार झाला. या अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव देविदास मधुकर होळकर (५५, रा. शिवनगर, नारळा पैठण) असे आहे.
अधिक माहिती अशी की, पैठण येथील न्यायालयामध्ये कार्यरत महिला वकिलाचे पती देविदास मधुकर होळकर हे पैठण येथील एमआयडीसी कंपनीत नोकरी करून बुधवारी रात्री १०:३० वाजेदरम्यान दुचाकीवरून पैठण येथील घराकडे येत असताना अचानक कातपूर फाट्याच्या कॅनलजवळ मागून जोरदार वेगात गणेश दराडे (रा. पांगोरी पिंपळगाव, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) यांची कार (एमएच १६ बीझेड ६४८२) ने जोरदार वेगात असल्याने दुचाकीला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या देविदास मधुकर होळकर यांना तातडीने पैठण येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
वैद्यकीय अधिकारी यांनी होळकर यांना तपासून मृत घोषित केले. सदरील अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि ईश्वर जगदाळे यांनी घटनास्थळाची पाहणी करून जमादार कर्तरसिंग सिंगल यांनी पंचनामा करून पोलिस ठाण्यात नोंद घेतली. अपघात घडल्यावर फरार झालेल्या चालक-मालकाचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पैठण ते छत्रपती संभाजीनगर मार्गावरील कातपूर कॅनल परिसरात काही दिवसांपूर्वी रस्ते विकास प्राधिकरण अंतर्गत संबंधित विभागाच्या ठेकेदार व अधिकाऱ्यांनी आपल्या मर्जीप्रमाणे रस्त्याची रुंदीकरण नावाला केले. सदरील रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट व थातूरमातूर पद्धतीने करून कॅनलवर बसविण्यात आलेल्या या ठिकाणी कुठलाही फलक लावण्यात आलेला नाही. तसेच गतिरोधकाला रंग किंवा रेडियम नसल्यामुळे रात्रीच्या वेळी या मार्गावरून रहदारी करणाऱ्या वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. यामुळे दररोज अपघातात मृत्यू होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे.