PM Crop Insurance : पाऊस न पडल्याने झालेल्या नुकसानीचा पीक विमाही नाही

PM Crop Insurance : पाऊस न पडल्याने झालेल्या नुकसानीचा पीक विमाही नाही

छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्तसेवा; पाऊस न पडल्याने झालेल्या नुकसानीचा पीक विमा मिळणार नाही, असे उत्तर विमा कंपन्यांच्या कॉल सेंटरकडून शेतकर्‍यांना देण्यात येत आहे. पावसाने ओढ दिल्याने पीक विमा मिळाल्यास काही दिलासा मिळेल, या शेतकर्‍यांच्या अपेक्षेवर पीक विमा कंपन्यांच्या कॉल सेंटरकडून पाणी फिरविण्यात येत आहे. कॉल सेंटरकडून मिळणार्‍या उत्तरामुळे शेतकर्‍यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दुसरीकडे, सरकारचा कोरडा आणि ओला दिवसाचा नियमही शेतकर्‍यांसाठी जाचक ठरत आहे.

एकीकडे पाऊस नसल्याने उभी पिके करपू लागली आहेत. हताश शेतकरी विमा कंपन्यांकडे आशेने कॉल करत आहेत. पाऊस न पडल्याने पिकांचे नुकसान झाल्यास भरपाईसाठी शेतकरी पात्र ठरत नाहीत, या उत्तराने शेतकरी हवालदिल आहेत. सिल्लोड तालुक्यातून तसेच निपाणी येथून विमा कंपन्यांना कॉल केल्यानंतर असे अनुभव आल्याचे शेतकर्‍यांनी म्हटले आहे. जिल्हा कृषी अधिकार्‍यांनी मात्र 21 दिवसांचा पावसाचा खंड पडल्यास पीक विमा द्यावा लागणार असल्याचे सांगितले.

कोरडा-ओला दिवसनियमाचा मोठा फटका

नियमानुसार ओला आणि कोरडा दिवस अशी नोंद घेण्यात येते. अडीच मि.मी. पाऊस पडल्यास सरकारी नियमानुसार तो ओला दिवस पकडला जातो; अन्यथा कोरडा दिवस समजला जातो. पण अडीच मि.मी. पावसात उभे राहिल्यास सदराही पूर्ण ओला होत नाही. 20 दिवस कोरडेगेल्यावर एकविसाव्या दिवशी अडीच मि.मी. पाऊस झाल्यास लाभ मिळत नाही. तो मिळायचा तर आणखी पुढील 21 दिवस कोरडे जाण्याची वाट बघावी लागते. या नियमामुळे शेतकरी पीक विम्याच्या 25 टक्के अग्रीमपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news