

Although the name has been changed to Chhatrapati Sambhajinagar, the power bills of the consumers still show Aurangbad
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवाः जिल्ह्याचे नामांतर होऊन दोन वर्षांचा कालावधी उलटत आहे. दप्तरी छत्रपती संभाजीनगर असे नामांतर केले असले तरी ग्राहकांच्या वीज बिलांवर मात्र अद्यापही औरंगबादच आहे. त्याचबरोबर पिन कोडचाही घोळात घोळ असल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. महावितरणला अद्यापही औरंगाबाद या नावाचा मोह सुटला नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्ह्यासह शहराचे नामांतर झाल्यानंतर राज्य शासनाच्या अख्यारित असलेल्या सर्वच कार्यालयाने नावाच्या पाट्यांसहित दैनंदिन कामाकाजात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर या नावाचा उल्लेख सुरू केला आहे. महावितरण-नेही कार्यालयीन पाट्या तसेच दैनंदिन कामाकाजात संभाजीनगरचा वापर केला आहे.
परंतु ग्राहकांना देण्यात येणाऱ्या बिलांवर मात्र औरंगाबाद कायम ठेवले आहे. ते एवढ्यावरच बसले नाहीत तर अड्रेस अपडेटची सिस्टम अद्यापही शहराच्या विविध भागांतील पिनकोड घेण्यास तयार नसल्याने ग्राहकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
वीज बिल रहिवाशांचा पुरावा ग्राह्य धरला जात नसला तरी अनेक कागदपत्रे काढण्यासाठी वीज बिलांची मागणी होते. यावर गावाचे नाव औरंगाबाद असल्याने कामात अडथळे येत आहेत. यामुळे ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.