

छत्रपती संभाजीनगर: फुलंब्री तालुक्यातील पाथरी येथील खंबाट वस्तीत एकाच कुटुंबातील तीन मुलांना अचानकपणे लुळेपणा आणि तीव्र अशक्तपणा आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या मुलांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. हा आजार नेमका काय आहे, यावरून सध्या गूढ निर्माण झाले असून, 'जीबीएस' (Guillain-Barré Syndrome) की पोलिओचा धोका, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खंबाट वस्ती येथील एकाच कुटुंबातील ३० महिने, ९ वर्षे आणि ११ वर्षे वयाच्या तीन मुलांना अचानक चालताना त्रास होऊ लागला आणि त्यांच्यात तीव्र अशक्तपणा दिसून आला. ही तिन्ही मुले एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. लक्षणे गंभीर दिसू लागल्याने कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. सध्या या मुलांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन मुलांवर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. एका मुलाला जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे.
या मुलांच्या रक्ताचे आणि इतर नमुनेही तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, त्याचा अहवाल आल्यानंतरच आजाराचे नेमके निदान स्पष्ट होईल. तोपर्यंत नागरिकांनी घाबरून न जाता, कोणतीही लक्षणे दिसल्यास तात्काळ आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. एकाच वेळी तीन मुलांना सारखीच लक्षणे दिसल्याने आरोग्य विभागाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
'अॅक्युट फ्लॅसिड पॅरॅलिसिस' (AFP) संशयित रुग्ण: आरोग्य विभागाने या तिन्ही मुलांची तीव्र लुळेपणाचे संशयित रुग्ण म्हणून नोंद केली आहे. पोलिओ निर्मूलन कार्यक्रमांतर्गत अशा रुग्णांवर विशेष लक्ष ठेवले जाते.
गावात सर्वेक्षण: आरोग्य विभागाच्या पथकाने तात्काळ खंबाट वस्तीत सर्वेक्षण सुरू केले आहे. इतर कोणाला अशी लक्षणे आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.
पाण्याचे नमुने तपासणी: खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत तात्पुरते बंद करण्यात आले असून, पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.