

छत्रपती संभाजीनगर : फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथे प्रवाशांसाठी बनवण्यात आलेल्या एसटीच्या थांब्यावर परिसरातील गुरांना बांधण्यात येत असल्याने प्रवाशांची चांगलीच कुचंबना होत आहे. याकडे एसटीचे अधिकारी कानाडोळा करत असल्याने प्रवाशांना गुरांच्या वावरातच बस पकडावी लागत आहे.
बाबरा हे छोटेसे गाव असल्याने या ठिकाणी बसस्थानक नसले तरी या ठिकाणी बस थांबा व प्रवाशांना थांबण्यासाठी आमदार निधीतून शेड बनवण्यात आले आहे. या शेडच्या परिसराचा वापर नागरिक गुरे बांधण्यासाठी व साहित्य ठेवण्यासाठी करत असल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना प्रवाशांनी अनेकदा माहिती दिली, परंतु अधिकारी याकडे कानाडोळा करत प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष करत आहेत.
प्रवाशांनी अनेकदा माहिती दिली, परंतु अधिकारी याकडे कानाडोळा करत प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष करत आहेत.एसटीच्या या कामचुकार धोरणामुळे या परिसरातील प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शेडचा लाभप्रवाशांना नाही
ऊन, वारा, पाऊस या काळात प्रवाशांना असुविधा होऊ नये म्हणून हे शेड उभारण्यात आले आहे. याचा लाभ काही दिवस प्रवाशांनी घेतलाही. दरम्यान या शेडच्या समोरच गुरांना चक्क बांधून ठेवण्यात येत आहे. त्याच बरोबर इतर साहित्यही प्रवासी बसण्याच्या जागेवर ठेवण्यात येत असल्याने या शेडचा लाभ एसटीच्या प्रवाशांना घेता येत नाही. या बाबत गावचे कारभारीही काहीच निर्णय घेत नसल्याने प्रवाशांना ऊन, वारा, पाऊस याचा सामना करतच बसची प्रतीक्षा करावी लागत आहे.