

नितीन थोरात
वैजापूर : जादूटोण्यांचा वापर करून भोळ्या-भाबड्या सामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांकडून प्राप्त झालेल्या चित्रफितीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपीचे नाव संजय रंगनाथ पगार (रा. शिऊर, ता. वैजापूर) असे आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा सामान्य लोकांना आपल्या स्वयंघोषित "जागृत स्थळावर" बोलावून, स्वतःला देव असल्याचे भासवून, पीडितांच्या दुःखाशी खेळ करत होता. तो पायातील बूट त्यांच्या तोंडावर ठेवून, हातातील ढोलकी वाजवत "अलख निरंजन, अलख निरंजन" असे म्हणत त्यांच्या शारीरिक छळ करत असल्याचा व्हिडिओ अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना दिला.
या अनुषंगाने, पोलिसांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल करून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन आणि काळी जादू प्रतिबंधक कायदा २०१३ अंतर्गत शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वैभव रणखांब करीत आहेत.
या घटनेबाबत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखांब यांच्याशी संपर्क साधला असता, या सर्व घटनेचा व्हिडिओ तुमच्याकडे आहे का? अशी विचारणा त्यांना करण्यात आली. यावर त्यांनी, तो व्हिडिओ आमच्याकडे असून, तो पेन ड्राइव्हमध्ये आहे, असे सांगितले.
तसेच, या प्रकरणात फिर्याद देणारे पोलीस कर्मचारी किशोर आघाडे यांना विचारले असता, आम्ही तो व्हिडिओ पाहूनच गुन्हा दाखल केला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, व्हिडिओ देता येणार नाही, तो पेन ड्राइव्हमध्येच आहे, असेही त्यांनी सांगितले. यामुळे पोलिसांकडून अंधश्रद्धेचा भांडाफोड करणारा महत्त्वाचा व्हिडिओ उघड करण्यास नकार दिला गेल्याचे दिसून येते.
समाजमाध्यमांसह अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य नेहमी जनजागृतीचे काम करत असतात. एवढेच नव्हे, तर आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, प्रत्येकाच्या घरात टीव्ही आहे. तरीदेखील समाज एवढा मागे का? यात जेवढे प्रशासन जबाबदार आहे, तेवढेच नागरिकही दोषी आहेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आजही समाजातील काही घटकांमध्ये अंधश्रद्धेचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो.