

छत्रपती संभाजीनगर : विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांची शासनाने सेवानिवृत्तीच्या सहा महिने आधी मुंबई येथे जीएसटीच्या सह आयुक्तपदी बदली केली आहे. तर त्यांच्या जागेवर दोन आठवड्यांपूर्वीच छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्तपदावरून बदलून मुंबईला गेलेल्या जी. श्रीकांत यांना नियुक्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे जी. श्रीकांत यांच्यासाठी विभागीय आयुक्तांचे पद निवड श्रेणीत अवनत (दर्जा कमी) करण्यात आले आहे.
पापळकर हे ३१ मे २०२५ रोजी विभागीय आयुक्त म्हणून रुजू झाले होते. ते डिसेंबर २०२६ मध्ये सेवानिवृत्त होणार असल्याने तोपर्यंत ते याच पदावर राहतील, असे समजले जात होते. मात्र राज्य सरकारने गुरुवारी अचानक त्यांची बदली केली. पापळकर यांना विभागीय आयुक्त म्हणून साडेदहा महिन्यांचाच अवधी मिळाला. त्यांच्या जागेवर जी. श्रीकांत यांची नवे विभागीय आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
श्रीकांत हे याआधी तीन वर्षे छत्रपती संभाजीनगर महापालिकेत आयुक्त होते. दोन आठवड्यांपूर्वी म्हणजे २ एप्रिल २०२६ रोजी राज्य सरकारने त्यांची मुंबई येथे जल जीवन मिशनच्या अभियान संचालकपदी बदली केली होती. तिथे रुजू झाल्यानंतर लगेचच त्यांची पुन्हा छत्रपती संभाजीनगरात विभागीय आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. जी. श्रीकांत यांना विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार त्वरित स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मिनियार यांचीही बदली
राज्य सरकारने गुरुवारी चार आयएएस अधिकार्याच्या बदल्या केल्या. त्यात छत्रपती संभाजीनगर सिडकोचे मुख्य प्रशासक जगदीश मिनियार यांचाही समावेश आहे. मिनीवार यांची पुणे येथे महिला व बाल कल्याण आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. सिडकोच्या मुख्य प्रशासकपदी मात्र अद्याप कोणाचीही नियुक्ती झालेली नाही.