

पाचोड : पैठण तालुक्यातील थेरगाव शिवारात चोरट्यांनी सौरऊर्जा प्रकल्पांच्या वायरवर डल्ला मारत तब्बल आठ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केल्याची घटना गुरुवारी (दि.9) सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. एक ते दीड महिन्यात अंदाजे दीडशे ते दोनशे शेतकऱ्यांच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे वायर चोरट्यांनी चोरून नेले आहे.
बुधवारीरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी शेतात बसवलेल्या सौर पंपाच्या महागड्या वायर कापून चोरून नेल्या. सकाळी सुरेश मापारी हे शेतकरी शेतात गेल्यानंतर ही बाब लक्षात आली. यानंतर त्यांनी परिसरात पाहणी केली व अन्य शेतकऱ्यांना याची कल्पना दिली असता याच शिवारातील मिरा शाईनाथ मापारी,आबासाहेब मुरलीधर मापारी,प्रकाश अंबादास मापारी दादाभाऊ रंजित मोरे, बाळू रंजित मोरे, गणेश दादाभाऊ मोरे आणि रघू मोरे या शेतकऱ्यांचे सौरऊर्जेवर चालणाऱ्या पंपासाठी वापरण्यात येणाऱ्या वायर चोरी गेल्याचे लक्षात आले.
पाचोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन पंडित यांच्या सह स.फौ.गोविंद राऊत, विष्णू सानप, पोलिस पाटील विश्वनाथ मगरे यांनी घटनास्थळी पाहणी करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.
सुस्त पोलिस प्रशासन
एक ते दीड महिन्या पासून सोलर कृषी पंपाचे वायर चोरणारी टोळी सक्रिय झालेली असून अंदाजे 200 कृषी पंपाचे वायर अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने शेतकऱ्यांत संतापाची लाट उसळली आहे. अद्याप एका ही घटनेतील चोरट्यांना स्थानिक पोलिस व ग््राामीण स्थानकी गुन्हे शाखेला पकडता आलेले नाही. वायर चोरीला गेल्याने उन्हाळ्यात फळबागांना पाणी देणे शक्य होत नसल्याने त्या जळून जात आहेत तर पशुधनाला पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे आता या प्रकरणात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.