Crime news | वासनेचा सैतान अन् महिलेचा बळी! 'ती' एक चूक नराधमाला पडली महाग

Crime news |
Crime news | वासनेचा सैतान अन् महिलेचा बळी! 'ती' एक चूक नराधमाला पडली महाग
Published on
Updated on

अशोक मोराळे, पुणे

एकटीला पाहून त्याच्यातला वासनांध नराधम जागा झाला होता. मागील दोन-तीन दिवसांपासून तो तिच्यावर पाळतच ठेवून होता. अखेर एका रात्री त्याला ती संधी मिळाली. त्याने तिला आपल्या वासनेची शिकार करायचे ठरवले. मात्र, त्या नराधमाने झडप घालताच तिने मोठ्याने आरडाओरडा करून त्याला विरोध केला. मात्र, अगोदरच डोक्यात वासनेचा सैतान संचारलेल्या त्याने तेथेच पडलेल्या एका दगडाने तिचे डोके ठेचून हाताने गळा आवळला. खून केल्यानंतर तो परत पहाटेच्या वेळी घटनास्थळी आला होता. नेमकी त्याची तीच चूक गुन्हे शाखेच्या पथकाने हेरली अन् अनोळखी महिलेच्या खुनाचा छडा लावत आरोपीला बेड्या ठोकल्या.

3 मार्च रोजीचा तो दिवस होता. पुण्यातील हडपसर-सासवड रस्त्यावरील दिवे घाटाच्या पायथ्याशी असलेल्या काची कंपनी शेजारील मोकळ्या जागेत एका महिलेचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आला होता. लघुशंकेसाठी गेलेल्या एका व्यक्तीच्या हा प्रकार निदर्शनास आला. महिलेच्या डोक्यात जखम असल्यामुळे त्या व्यक्तीच्या देखील लक्षात आले होते, की या महिलेचा खून झालाय म्हणून. त्याने तत्काळ ही माहिती पोलिसांना दिली. काही वेळातच फुरसुंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी अमोल मोरे घटनास्थळी दाखल झाले. त्याच बरोबर गुन्हे शाखेची पथके सुद्धा पोहोचली. महिलेचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. अहवालात महिलेचा डोक्यात दगड घालून, गळा आवळून खून केल्याचे समोर आले. महिलेची अद्याप ओळख पटलेली नव्हती. घटनास्थळाची पाहणी केली असता, कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती लागला नव्हाता. आता महिलेची ओळख पटविण्यापासून खुन्याला बेड्या ठोकण्यापर्यंतची कामगिरी पोलिसांना बजावायची होती. खरं तर कामगारांची वस्ती असलेला हा परिसर. छोट्या मोठ्या कंपन्या आल्यामुळे राज्यासह बाहेरच्या राज्यातील लोकं येथे कामासाठी येतात. त्यात फिरस्त्यांची देखील राबता येथे असतो.

फुरसुंगी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. याचवेळी गुन्हे शाखा युनिट सहाचे पथक देखील पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. परिसरात महिलेच्या बाबत थोडी चौकशी केली तेव्हा ती फिरस्ती असल्याची माहिती हाती लागली. दुसरीकडे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे पडताळून पाहिले. कॅमेर्‍याची एक-एक कडी जोडत असताना, घटनास्थळापासून शंभर ते दोनशे मीटर अंतरावर असलेल्या एका पेट्रोल पंपाच्या कॅमेर्‍यात एका व्यक्तीची सावली कैद झाल्याचे निदर्शनास आले. तोच काय एक धागा पोलिसांच्या हाती होता. त्यावरूनच पोलिस अंमलदार अमित कांबळे, तानाजी देशमुख यांनी संशयित आरोपी प्रकाश माने याचा माग काढला. त्याच्या सावलीतील चालण्याच्या लकबेवरूनच पोलिसांनी त्याला शोधले होते. शिवाय परिसरातील काही लोकांनी तो माने एका कंपनीत काम करत असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. परंतु, पोलिसांसमोर तो काही केल्याने आपले तोंड उघडायला तयार नव्हता. शेवटी त्याचा बनाव जास्त वेळ पोलिसांसमोर टिकला नाही.

माने हा मूळचा लातूर जिल्ह्यातील राहणारा. तो अविवाहित असून, येथील एका कंपनीत सुपरवायझरची नोकरी करतो. दोन-तीन दिवसांपूर्वी त्याने या महिलेला पाहिले होते. तेव्हा पासून त्याच्या मनातला वासनांध राक्षस जागा झाला होता. महिला थोडी मनोरुग्ण अवस्थेत होती. त्यामुळे त्याचे आयतेच फावले. 1 मार्च रोजी रविवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास तो महिलेला काची कंपनी शेजारील मोकळ्या जागेत घेऊन गेला. तिथे त्याने महिलेसोबत शरीरसंबंधासाठी जबरदस्ती केली. मात्र, महिलेने आरडाओरडा करीत त्याला विरोध केला. त्याचवेळी त्याने महिलेच्या डोक्यात दगड घातला आणि हाताने गळा दाबला. त्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला.

माने याने महिलेचा खून केल्यानंतर तेथून पळ काढला तरी आपल्याला कोणी पाहिले तर नाही ना, या भीतीपोटी घाबरून होता. त्यानंतर सोमवारी (दि. 2) सायंकाळी साडेपाच वाजता देखील तो परत मृतदेह पाहून गेला होता. पोलिस आरोपीचा माग काढत होते. त्यांना कॅमेर्‍यात पहाटेच्या वेळी माने दिसून आला होता. तोच धागा पकडून पोलिसांनी अखेर त्याला बेड्या ठोकल्या. अद्याप खून झालेल्या महिलेची ओळख पटलेली नाही. मात्र, पोलिसांनी खुन्याला बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, अंमलदार तानाजी देशमुख, प्रमोद टिळेकर, गणेश माने यांच्या पथकाने आरोपीला गजाआड करण्यात मोठी भूमिका बजावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news