

छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यातील पाटेगाव येथील वाळू घाटाच्या टेंडरच्या नावाखाली वाळूमाफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. महसूल आणि स्थानिक पोलिसांच्या अर्थपूर्ण संगनमताने माफियांनी तब्बल १ लाख ब्रासपेक्षा अधिक अवैध वाळू उपसा करून शासनाच्या तिजोरीवर दिवसाढवळ्या दरोडा टाकला आहे.
या बेछूट लुटीला विरोध करणाऱ्यांवर थेट खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष विशाल काळे यांनी केला आहे. या संपूर्ण घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन सोमवारी (दि. ४) विशेष पोलिस महानिरीक्षकांना (आयजी) देण्यात आले आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, पाटेगाव येथील वाळू घाटासाठी ज्या फर्मला केवळ २ हजार ८६० ब्रास वाळू उपशाची परवानगी लिलावात देण्यात आली होती, त्याच फर्मने वाळू वाहतूकदार, महसूल अधिकारी आणि स्थानिक पोलिसांना हाताशी धरून तब्बल १ लाख ब्रासपेक्षा अधिक वाळूचे उत्खनन केले आहे.
वाळू घाटाची अक्षरशः चाळण करण्यात आली आहे. नियमानुसार वाहनांना जीपीएस, व्हीटीएस आणि ई-पास असणे बंधनकारक असताना, या सर्व नियमांना केराची टोपली दाखवत विना पास वाहनांद्वारे बेसुमार उपसा सुरू या आहे. विशेष म्हणजे, महाघोटाळ्याबाबत माहिती अधिकारात विचारणा केली असता, पोलिस आणि महसूलचे अधिकारी जाणीवपूर्वक उत्तरे देणे टाळत आहेत.
२५ फूट पाण्यातूनही उपसा
सध्या गोदावरी पात्रात २० ते २५ फूट पाणी आहे. असे असतानाही महसूलच्या अधिकाऱ्यांचे हात ओले करून वाळूमाफिया सर्व नियम धाब्यावर बसवून बेसुमार वाळू उपसा करत आहेत. या संघटित वाळू माफियांच्या टोळीवर तत्काळ गुन्हे दाखल करून त्यांच्या मुसक्या आ वळाव्यात; अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
वाळूपट्ट्यात हल्ले, गोळीबार
पाटेगाव, कावसान, वडवाळी, वाघाडी, नायगाव, मायगाव आणि आपेगाव या गोदावरी पट्ट्यात सध्या वाळू माफियांनी दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. वाळूच्या राड्यातून जीवघेणे हल्ले नित्याचेच झाले आहेत. कावसान येथे एकावर प्राणघातक वार करण्यात आले. तर १९ एप्रिल रोजी एका अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाखाली चिरडून एका व्यावसायिकाचा बळी गेला. दादेगाव-नायगाव येथे चक्क हवेत गोळीबार झाल्याची भयंकर घटना घडली; मात्र महसूल आणि पोलिसांनी हे प्रकरण सोयीस्करपणे दाबून टाकल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला.