

कुरुंदवाड : दत्तवाड ता. शिरोळ येथे निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आनंदोत्सवाला हिंसक वळण लागल्याची घटना समोर आली आहे. निकालानंतर जल्लोष साजरा करत असताना फाळकुट दादा व झोपडपट्टी दादा आणि त्यांच्या साथीदारांनी काही युवकांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला असून, घटनेनंतर हे दादा गावातून फरार झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण दत्तवाड गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान अद्याप कुरुंदवाड पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.सरकारी दवाखाना परिसरात फाळकुट दादा आल्याचे समजताच दुसऱ्या गटाने मोठी गर्दी केली आहे. मारहाण झालेल्या युवकांच्या मित्रांनी पळ काढलेल्या फाळकुट दादांचा शोध सुरू केला असून, त्यांच्या दहशतीबाबतची माहिती पोलिस प्रशासनापर्यंत पोहोचली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिस निरीक्षक संतोष माने यांनी तात्काळ दत्तवाड गावात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. फरार आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, दादांकडून घडलेला हा प्रकार म्हणजे दोन गटांतील हाणामारीचा प्रकार असल्याची चर्चा दत्तवाड गावात रंगली आहे. याचे चित्रीकरण परिसरातील काही खाजगी सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे,निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आधीच तणावपूर्ण वातावरण असताना अशा प्रकारची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या घटनेनंतर ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, “निवडणुकीच्या काळात या दादांना हद्दपार का करण्यात आले नाही?” असा संतापजनक सवाल उपस्थित केला जात आहे. फाळकुट दादा व झोपडपट्टी दादांची दहशत यापूर्वीही गावात चर्चेचा विषय ठरली होती, मात्र तरीही त्यांच्यावर वेळीच कठोर कारवाई झाली नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. गावातील शांतता अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने या दादांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी आता ग्रामस्थांमधून होत आहे. पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे.