

Vaishali Bombale Chairperson Sanjay Lagane
पैठण : पैठण तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेना (शिंदे गट)च्या वैशाली विनोद बोंबले, तर उपसभापतीपदी संजय अशोक लगाने यांची बिनविरोध निवड झाली. आमदार विलास बापू भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली.
पैठण तालुक्यातील पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १८ सदस्यांसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. या निवडणुकीत आमदार विलास बापू भुमरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (शिंदे गट)ने पंचायत समितीवर एकतर्फी वर्चस्व प्रस्थापित करत १७ सदस्य मोठ्या मताधिक्याने निवडून आणले.
मंगळवारी (दि. १०) दुपारी पैठण पंचायत समितीच्या सभागृहात नवनिर्वाचित सदस्यांची बैठक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारे यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार ज्योती पवार, नायब तहसीलदार वैशाली कांबळे, निवडणूक सहाय्यक अमोल पाखरे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड तसेच सहाय्यक गटविकास अधिकारी राजेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती व उपसभापती निवड प्रक्रिया पार पडली.
सभापती पदासाठी ढोरकीन गणातून निवडून आलेल्या वैशाली विनोद बोंबले यांनी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तर उपसभापती पदासाठी रांजणगाव खुरी गणातील संजय अशोक लगाने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली.
या निवडीनंतर शिवसेना (शिंदे गट)चे कार्यकर्ते व समर्थकांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.