

चंद्रकांत अंबिलवादे
पैठण : तालुक्यातील घरकुल योजनेच्या नावावर वाळूचा काळाबाजार करणाऱ्या विरुद्ध व वाळू तस्करांना सहकार्य करणाऱ्या महसूल विभागातील अधिकारी यांच्याविरुद्ध तात्काळ कारवाई करावी. या मागणीसाठी सोमवारी (दि.८) सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान पैठण ते शेवगाव मार्गावरील पाटेगाव गोदावरी नदीत विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जलसमाधी आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे गोदावरी नदीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.
पैठण तालुक्यातील पाटेगाव, चनकवाडी, हिरडपुरी येथील गोदावरी नदीतून अवैधरित्या घरकुल योजनेच्या नावाखाली दिवसाढवळ्या हजारो ब्रास वाळू उत्खनन करून घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना वाटप करण्यात येत असल्याचे प्रशासनाने जाहीर केले. तरीही प्रत्यक्षात मात्र दररोज रात्री व दिवसा पैठण तहसीलदार व महसूल पथकातील अधिकारी, कर्मचारी यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणावर वाळूचा काळाबाजार सुरू आहे. या वाळू तस्करांना सहकार्य करणारे संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध तात्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाटेगाव येथील गोदावरी नदीत जलसमाधी आंदोलन सुरू केले.
यावेळी नायब तहसीलदार राहुल बनसोडे, मंडळ अधिकारी कल्पना शेळके, तलाठी शितल झिरपे पोलीस निरीक्षक महादेव गोमारे,उपनिरीक्षक संभाजी खाडे, राम बाराहाते, जमादार राजेश आटोळे उपस्थित असून पाण्यात आंदोलन करणारे अनिल राऊत, रामेश्वर बावणे, भगवान सोरमारे, सुभाष नवथर, शुभम काळे, शिवाजी साबळे उपस्थित होते. जोपर्यंत तहसीलदार, जिल्हाधिकारी आंदोलन स्थळी येत नाहीत तोपर्यंत आंदोलन समाप्त होणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.