Paithan Crime | पैठणमध्ये मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला करणारा फरार आरोपी दीड वर्षांनंतर जेरबंद

छत्रपती संभाजीनगरातून गुन्हे शाखेने केली अटक; पैठण न्यायालयाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
  Crime News
Crime NewsFile Photo
Published on
Updated on

Paithan Accused Arrested

पैठण : पैठण येथील मराठा महासंघाचे पदाधिकारी आतिश उत्तमराव गायकवाड यांच्यावर लोखंडी रॉड आणि प्लास्टिक दांड्याने जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी दीड वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली. आकाश प्रभाकर खरात (रा. लेणी रोड, देवनदीनगर, न्यू पहाडसिंगपुरा, बेगमपुरा, छत्रपती संभाजीनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला पैठण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

मंगळवार, २७ मे २०२५ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास आतिश गायकवाड हे शहरातील झुंजे मंगल कार्यालय परिसरातून घरी जात होते. त्यावेळी अज्ञात सात ते आठ हल्लेखोरांनी त्यांच्यावर लोखंडी रॉड आणि प्लास्टिक दांड्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात गायकवाड यांना गंभीर दुखापत झाली होती.

  Crime News
Paithan Crime News : गुप्तधनाच्या आमिषाने सराफाला बोलावले; दहा लाख लुटले

घटनेनंतर हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी पैठण शहर बंद ठेवून आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर तत्कालीन पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळाचे तांत्रिक विश्लेषण तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासादरम्यान हल्ल्यात आठ तरुणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले होते.

मात्र, या प्रकरणातील आरोपी आकाश खरात हा दीड वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत होता. तो छत्रपती संभाजीनगर शहरात लपून राहत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक विजय राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बळीराम काकडे, सहाय्यक फौजदार लहू थोटे, संतोष पाटील, शेख कासम, हवालदार दत्ता मुंडे आणि गणेश ढाकणे यांच्या पथकाने सापळा रचून आकाश खरात याला अटक केली.

शुक्रवारी (दि. १८) आरोपीला पैठण न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news