

पैठण : नाथसागर (जायकवाडी) धरणातून गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग (साडेतीन लाख क्यूसेकहून अधिक) करण्यात आल्यामुळे, पैठण ते अहिल्यानगर भागाला जोडणाऱ्या पाटेगाव येथील पुलाचे मोठे नुकसान झाले आहे. पुलाचे लोखंडी कठडे वाहून गेले असून, पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे हा पूल अनेक ठिकाणी खचला आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून, पुलाच्या दोन्ही बाजूंना सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
सोमवारी गोदावरी नदीतील पाण्याचा विसर्ग काहीसा कमी झाल्याने पाटेगाव येथील पूल पाण्याबाहेर उघडा पडला. परंतु, पाण्याची गती एवढी प्रचंड होती की, त्याने पुलावरील सुरक्षेसाठी लावलेले दोन्ही बाजूचे लोखंडी कठडे पूर्णपणे वाहून नेले. एवढेच नाही, तर पाण्याचा मारा लागून हा पूल ठीक ठिकाणी खचला आहे.
पुलाची झालेली दुरवस्था पाहता, या मार्गावरील वाहतुकीला मोठा धोका निर्माण झाला आहे. कोणतीही संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी तात्काळ या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबवली आहे. परिणामी, अत्यावश्यक कामांसाठी प्रवास करणारे नागरिक आणि मालवाहू वाहने दोन किलोमीटरपर्यंत अडकून पडली आहेत.
वाहतूक ठप्प झाल्यामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती आणि नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने पुलाची पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ उपविभागीय अभियंता राजेंद्र बोरकर, नाथ मंदिर कार्यकारी विश्वस्त दादा पाटील बारे, व्यापारी महासंघाचे पवन लोहिया, अभियंता चव्हाण आणि स्थानिक सा. बा. विभागाचे बाबुलाल चोरडिया यांनी पाहणी केली.
या अधिकाऱ्यांनी तातडीने या ठिकाणी वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, जेणेकरून दोन्ही जिल्ह्यांमध्ये पूर्ववत संपर्क सुरू होऊ शकेल.
दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या पाटेगाव येथील पुलाची निर्मिती 43 वर्षांपूर्वी झाली आहे. विशेष म्हणजे, या पुलाची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी पैठण येथील स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी धनराज शेळके यांची आहे.
या पार्श्वभूमीवर, पाटेगाव येथील ग्रामस्थांनी अत्यंत गंभीर आरोप केला आहे. स्थानिक सा. बां. विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी पुलाची योग्य दुरुस्ती न करता, केवळ 'मलमपट्टी' करून ठेकेदारांशी संगनमत केले. या संगनमताने शासनाला लाखो रुपयांचा चुना लावण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या गंभीर आरोपामुळे कार्यकारी अभियंता अतुल चव्हाण यांनी पैठण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. पुलाची झालेली दुरवस्था पाहता, या आरोपांना बळकटी मिळत आहे.
दरम्यान सदरील पूल १९६९ यावर्षी निर्माण झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिले असून. सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी नवीन पूल निर्माण करावा अशी ही मागणी करण्यात येत आहे