

Missing Suspect Found Dead in Dadegaon
पैठण: पैठण तालुक्यातील चितेगाव येथील एका खून खटल्यातील संशयित आरोपी शेख अकबर महबूब मियाभाई शेख याचा मृतदेह दादेगाव (ता. पैठण) शिवारात आढळला. या घटनेमुळे चितेगाव परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, सपोनि निलेश शेळके यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. घातपात झाला का? या संदर्भात पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यातील चितेगाव येथील एका खून प्रकरणातील आरोपी असलेले शेगाव अकबर उर्फ मियाभाई महेबूब शेख (वय ५०) कारने (MH20BN - 4488) पंढरपूर येथे गेले होते. परंतु, त्यांच्याशी घरच्यांनी संपर्क केला असता फोन उचलला नाही. त्यामुळे नातेवाईकांनी बिडकीन पोलीस ठाण्यात दि.३० जूनरोजी तक्रार दाखल केली होती.
शेख यांचे दोन मोबाईल ढोरकिन गावाच्या परिसरात आढळून आले. आज (दि.१) दादेगाव (ता. पैठण) परिसरात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांना मिळाली. त्यांनंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी कार घटनास्थळी आढळून आली नाही. त्यामुळे हा प्रकार घातपात आहे का ? या संदर्भात पोलिसांनी तपास सुरू केला आहे.