

Over 175 Applications for Municipal Corporation Nominated Members' Posts
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महापालिकेतील स्वीकृत (नामनिर्देशित) नगरसेवक पदांसाठी मोठी चुरस निर्माण झाली असून, अंतिम मुदतीपूर्वीच इच्छुकांची संख्या पावणेदो-नशेच्या घरात पोहोचली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी आज सोमवारी (दि.३०) दुपारी ३ वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली असून, त्यानंतर १ एप्रिल रोजी अर्जाची छाननी होणार आहे.
महापालिकेत १० स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी १८ मार्चपासून नगर सचिव कार्यालयात अर्ज वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. २५ मार्चपर्यंत अर्ज वाटप करण्यात आले. या कालावधीत मोठ्या संख्येने इच्छुकांनी अर्ज घेतले.
अर्ज सादर करण्यासाठी आज सोमवारची अंतिम मुदत देण्यात आली असून, इच्छुकांना दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. त्यानंतर १ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेपासून मनपा आयुक्तांच्या दालनात सर्व अर्जाची छाननी केली जाणार आहे. स्वीकृत नगरसेवक म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे व्यक्ती, प्राध्यापक, वकील, डॉक्टर तसेच प्रशासकीय सेवेतून निवृत्त अधिकारी अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांची निवड केली जाते.
त्यामुळे या पदांसाठी विविध क्षेत्रांतील इच्छुकांनी उत्साहाने अर्ज दाखल केले आहेत. राजकीय पक्षांच्या संख्याबळानुसार या जागांचे वाटप होणार असल्याने प्रमुख पक्षांमध्येही हालचालींना वेग आला आहे. इच्छुकांमध्ये राजकीय पाठबळ मिळवण्यासाठी चढाओढ सुरू असल्याचे चित्र आहे.
अशी असणार सदस्यसंख्या
महापालिकेतील एकूण ११५ नगरसेवकांच्या संख्येनुसार १० स्वीकृत नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. या गणितानुसार प्रत्येक ११.५ नगरसेवकांमागे एक स्वीकृत सदस्य निवडण्याचा निकष लावण्यात आला आहे. त्यामुळे सर्वाधिक ५७ नगरसेवक असलेल्या भाजपला ५ जागा मिळणार आहेत. एमआयएमकडे ३३ नगरसेवक असल्याने त्यांना ३ जागा, शिवसेनेच्या शिंदे गट आणि उबाठा गटाला प्रत्येकी १ अशा २ जागा मिळणार आहेत.