

Outrage against toll plaza in Bidkin
बिडकीन, पुढारी वृत्तसेवा :
२५ वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर आणि मागील ४ वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे त्रस्त असलेल्या बिडकीनकरांचा संताप आता उफाळून आला आहे. छत्रपती संभाजीनगर ते पैठण या राष्ट्रीय महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झाले नसताना, अचानक बिडकीन शहराच्या मध्यवर्ती भागात उभारण्यात आलेल्या टोल नाक्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
३७ किलोमीटरच्या या महामागपैिकी ७ किलोमीटरचा चितेगाव मार्ग सतत वादात राहिला. रस्ता पूर्ण होण्याआधीच अवघ्या ६ महिन्यांत टोल नाका उभारण्यात आल्याने अपूर्ण रस्त्यावर टोल का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
विशेष म्हणजे, हा टोल नाका शहराच्या हद्दीतच आणि अत्यंत गर्दीच्या ठिकाणी उभारण्यात आला आहे. एका बाजूला पेट्रोल पंप व जुनं गाव, तर दुसऱ्या बाजूला शिक्षक कॉलनी, सहयोग नगर, पठाणवाडा, ईदगाह, मंदिरे, शाळा, जलशुद्धीकरण केंद्र आणि नव्या सात वसाहती अशा संवेदनशील परिसराच्या मधोमध हा टोल आल्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
सोशल मीडियावर संतापाचा उद्रेक
सध्या बिडकीनमध्ये सोशल मीडियावर टोल नाक्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. हा टोल आम्हाला मान्य नाही अशी भूमिका नागरिक उघडपणे मांडत आहेत.
शाळा-कॉलेज १०० फुटांवर
विद्यार्थ्यांना आणि पालकांना रोजच्या ये-जा करताना टोल भरावा लागणार का? हा प्रश्न आता गंभीर बनला आहे. स्थानिक व्यापाऱ्यांनाही मालाची ने-आण करताना आर्थिक व वेळेचा मोठा फटका बसणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.
१ एप्रिल रोजी आरपीआय नेते व सामाजिक कार्यकर्ते अमोल नरवडे यांनी ग्रामपंचायतीकडे लेखी अर्ज सादर करत, हा टोल नाका गावाच्या बाहेर स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे. ग्रामपंचायतीकडूनही यासंदर्भात ठराव मंजूर करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.