

Orders issued to take action against companies discharging polluted water into the Sukhna River
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा सुखना नदीच्या पुनरुज्ञ्जीवनाचे काम सुरू असतानाच नदीपात्रात दूषित पाणी सोडले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. चिकलठाणा एमआयडीसीतील काही कंपन्यांचे प्रदूषित पाणी नाल्यांद्वारे नदीत येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांचा शोध घेऊन संबंधित कंपन्यांना नोटिसा बजावण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र देण्याचे आदेश सोमवारी (दि. १९) महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी अधिकाऱ्यांना दिले असून नदीपात्रात ड्रेनेजचे पाणी सोडणाऱ्या नागरिकांवरही कारवाई करण्यात येणार आहे.
महापालिकेकडून खाम नदीच्या धर्तीवर सुखना नदीच्या पुनरुज्जीवनाचे काम हाती घेण्यात आले आहे. नदीपात्राचे खोलीकरण आणि रुंदीकरण केल्यानंतर दगडांच्या साहाय्याने पिचिंग करण्यात येत आहे. नदीच्या दोन्ही काठांवर हजारो वृक्षांची लागवडही करण्यात आली आहे. मात्र, नदीचे पुनरुज्जीवन सुरू असतानाच नदीपात्रात सोडले जाणारे सांडपाणी या कामापुढे आव्हान ठरत आहे.
सुखना नदीच्या या कामाची आयुक्त अमोल येडगे यांनी सोमवारी सकाळी सहा वाजता अधिकाऱ्यांसह पाहणी केली. यावेळी नदीकाठच्या काही नागरिकांकडून ड्रेनेजचे पाणी नदीपात्रात सोडले जात असल्याचे निर्दशनास आले. महापालिकेने वारंवार सूचना केल्यानंतर काही नागरिकांनी ड्रेनेजच्या मुख्य वाहिनीला जोडणी करून नदीत सोडले जाणारे पाणी बंद केले आहे.
मात्र, अद्यापही हा प्रकार पूर्णपणे थांबलेला नसल्याने नदीपात्रात सांडपाणी सोडणाऱ्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी येडगे यांनी दिले. दरम्यान, चिकलठाणा एमआयडीसीतील काह कंपन्यांचे प्रदूषित पाणी नाल्यांमार्फत सुखना नदीत येत असल्याचेही पाहणीदरम्यान समोर आले.
या प्रकाराचे सर्वेक्षण करून प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र पाठवावे आणि संबंधित कंपन्यांना नोटिसा बजावण्याबाबत कार्यवाही करावी, अश सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या पाहणीवेळी शह-अभियंता संजय कोंबडे, उद्यान अधीक्षक डॉ. विजय पाटील विशेष कार्याधिकारी जयवंत कुलकर्णी यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
संकुलाचे काम निर्धारित मुदतीत पूर्ण करा
चिकलठाणा येथे महापालिकेतर्फे उभारण्यात येत असलेल्या व्यापारी संकुलाचीही आयुक्त अमोल येडगे यांनी पाहणी केली. संकुलाचे काम निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याची सूचना त्यांनी कंत्राटदाराला केली. त्यानंतर झाल्टा फाटा येथील मलजल निस्सारण प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी करून कामाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याचे निर्देश खिल्लारी एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना दिले.