

Cambridge Chowk: Police officer acting as mediator gets assaulted
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा रस्त्यावर थांबलेल्या एका खाजगी ट्रॅव्हल्स बसच्या समोर दुचाकी आडवी लावून क्लिनरसोबत विनाकारण हुज्जत घालणाऱ्या तरुणाला समजावण्यासाठी गेलेल्या गस्त पथकावरच धावून जात थेट पोलिस अंमलदाराची गचांडी धरून शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे.
तुम्ही पोलिस आहात की नाही मला दाखवा असा मुजोरपणा दाखवून पोलिसांच्या हाताला झटका देऊन पसार झालेल्या या दुचाकीस्वाराला पोलिसांनी काही तासांत शोधून बेड्या ठोकल्या. हा प्रकार रविवारी (दि. १८) मध्यरात्री सव्वाबारा वाजेच्या सुमारास केंब्रिज चौक परिसरात घडला.
आनंद अशोक घोरपडे (२८, रा. गल्ली नं. २१, संजयनगर, मुकुंदवाडी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे पीटर मोबाईल गस्त पथक शासकीय वाहनाने शनिवारी रात्री हद्दीत गस्त घालत होते. मध्यरात्री १२.१५ वाजेच्या सुमारास केंब्रिज चौकात एक खाजगी बस (सीजी-०८-एवाय-०९१३) उभी दिसली. बसमधून प्रवासी खाली उतरत असताना, एकजण दुचाकी (एमएच-२०-सीएन-६५२३) थेट बसच्या समोर आडवी लावून बसच्या क्लिनरसोबत वाद घालत असल्याचे दिसले. उपनिरीक्षक आर. एस. बिघोत, अंमलदार समाधान उबाळे यांनी तात्काळ तिथे धाव घेतली.
पोलिसांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत, तुझी दुचाकी बाजूला घे, अशी समज दिली. मात्र, आरोपीने उलट पोलिसांशीच वाद वाद घालत अंमलदाराची थेट गचांडी धरली. तुम्ही पोलिस आहे की नाही मला दाखवा असे ओरडत त्याने पोलिसांविषयी असभ्य भाषेत अर्वाच्य शिवीगाळ केली. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, तो पोलिसांच्या हाताला जोराने झटका देऊन पसार झाला.
गस्त पथकाने रात्री त्याचा शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही. अखेर रविवारी सकाळी ७.२० वाजेच्या सुमारास चिकलठाणा परिसरातील बॅन्डी कंपनीसमोर संशयित थांबल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पुढील तपास उपनिरीक्षक लखनसिंग पचलोरे करत आहेत