

Opposition to alcohol parties; Assault on homeowner
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पेइंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या तरुणाने मित्रांना बोलावून रूमवर दारूच्या पार्ध्या सुरू केल्या. या प्रकाराला वैतागून घरमालकाने त्याला रूम खाली कर असे सुनावले. याच गोष्टीचा राग आल्याने, पेइंग गेस्टने त्याच्या तीन मित्रांसोबत मिळून मालकाला घराबाहेर बोलावून लोखंडी रॉड आणि पाईपने जबर मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. ७ सप्टेंबर) मध्यरात्री १:३० वाजेच्या सुमारास पदमपुरा भागात घडली. याप्रकरणी वेदांतनगर पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओंकार खरात आणि त्याचे इतर तीन अनोळखी मित्र अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी मनोज शंकर कुदाळे (२७, रा. पार्वती अपार्टमेंटसमोर, पदमपुरा) यांच्या तक्रारीनुसार, ते नागरिकांना पर्सनल लोन काढून देण्याचे काम करतात. त्यांच्या मालकीच्या घरात एक रुम त्यांनी पेइंग गेस्ट म्हणून ओंकार खरात याला दिली होती.
ओंकार गेल्या १५ दिवसांपासून तिथे भाड्याने राहत होता. मात्र, गेल्या ८-१० दिवसांपासून तो त्याचे तीन-चार मित्र रूमवर आणून दारू आणि सिगारेटच्या पार्त्या करत होता. हा प्रकार कुदाळे यांना न पटल्याने त्यांनी त्याला रूम खाली करण्यास सांगितले होते. सोमवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास कुदाळे घरात असताना ओंकारने त्यांना आवाज देऊन बाहेर बोलावले. तू मला रूम खाली करायला का सांगतो ? असा जाब त्याने विचारला.
त्यावर कुदाळे यांनी त्याला तू मित्रांना बोलावून दारूच्या पार्त्या करतोस, ते मला चालणार नाही, असे पुन्हा समजावून सांगितले. यावेळी ओंकार रागाने तेथून निघून गेला. अर्ध्या तासानंतर दीड वाजेच्या सुमारास ओंकार त्याच्या इतर तीन मित्रांना घेऊन पुन्हा तिथे आला. कुदाळे पार्किंगमध्ये असताना, रूम खाली करायला लावल्याचा राग मनात धरून ओंकार आणि त्याच्या मित्रांनी कुदाळे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली.
पार्किंगमध्ये पडलेला पडद्याचा पाईप आणि लोखंडी रॉड उचलून त्यांनी कुदाळे यांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. ओंकारने रॉडने कुदाळे यांच्या डाव्या हातावर मारले, तर मित्रांनी पाईपने डोक्यावर, कानाच्या मागे आणि मानेवर वार केले. कुदाळे यांनी मदतीसाठी आरडाओरड केल्याने आजूबाजूचे लोक जमा झाले. लोक आल्याचे पाहून ओंकार आणि त्याचे मित्र पाईप व रॉड तिथेच फेकून पळून गेले. पुढील तपास हवालदार विकास चव्हाण करत आहेत.
रूम खाली करण्यास सांगितल्याचा राग
पेइंग गेस्ट ओंकार खरात हा मित्रांना रूमवर बोलावून दारू-सिगारेटच्या पार्त्या करीत होता. याला कंटाळून घरमालक मनोज कुदाळे यांनी त्याला रूम खाली करण्यास सांगितले. याचाच राग मनात धरून ओंकारने तीन मित्रांसह कुदाळे यांना लोखंडी रॉड व पाईपने मारहाण केली. हल्ल्यात कुदाळे गंभीर जखमी झाले.