Sambhaji Nagar News : जन्म प्रमाणपत्रातील दुरुस्तीसाठी दीड महिन्याची प्रतीक्षा
One and a half month wait for correction in birth certificate
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
मनपाने ई-ऑफिसच्या माध्यमातून ऑनलाईन कारभार सुरू झाल्यानंतर अद्यापही झोन कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी फायलींचा गड्डा घेऊन बसलेले आहेत. यात मुख्यतः जन्म प्रमाणपत्र व जन्म प्रमाणपत्रातील दुरुस्तीसाठी नागरिकांना तब्बल दीड महिना प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे झोन कार्यालयातील शेकडो प्रकरणे प्रलंबित असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पालिकेच्या मुख्यालयाचा कारभार ऑनलाईन सुरू झाला असून, सर्व संचिकांना ऑनलाईनद्वारेच मंजुरी दिली जात आहे. त्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. नागरिकांना घरबसल्या सुविधा देण्यासाठी पालिकेने अॅप, संकेतस्थळ सुरू केले आहे. त्याद्वारे दाखल होणारे प्रस्ताव स्वीकारले जात असले तरी त्याची मूळ संचिका आणून जमा करावी लागते. मनपाच्या झोन कार्यालयातून जन्मप्रमाणपत्र काढावे लागते.
जन्म प्रमाणपत्रासाठी खासगी रुग्णालयातून मिळालेल्या डिस्जार्च कार्डाच्या आधारे प्रमाणपत्र मिळते. मात्र झोन कार्यालयात गेल्यानंतर नागरिकांकडे विविध कागदपत्रांची मागणी केली जाते. नवीन जन्मप्रमाणपत्र तीन ते चार दिवसांत मिळत असले तरी जन्म प्रमाणपत्रात दुरुस्ती करण्यासाठी मात्र एक ते दीड महिन्याचा कालावधी देण्यात येत असल्याने नागरिकांना विनाकारण झोन कार्यालयात चकरा माराव्या लागत आहे.
ऑनलाईन दुरुस्तीसाठी कर्मचाऱ्यांकडून संकेत स्थळ बंद आहे. शासनाचे संकेतस्थळ सुरू होत नाही, संकेतस्थळाला अडथळा येत आहे. मध्येच बंद पडत आहे. अशी उत्तरे मिळत असल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे.
सर्वच झोन कार्यालयात प्रस्ताव प्रलंबित
मनपाच्या झोन तीन, चार, पाच, सहा, सात, नऊ या कार्यालयाकडे जन्म प्रमाण-पत्रातील दुरुस्तीसाठीचे सर्वाधिक प्रस्ताव पडून आहेत. हे प्रलंबित प्रस्ताव तातडीने मार्गी लावले जात असले तरी कर्मचाऱ्यांची मानसिकता नसल्यामुळे विनाकरण प्रलंबित ठेवले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

