

Inspection of 196 postgraduate colleges from June 11
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रातील अनेक पदव्युत्तर महाविद्यालयांमध्ये आवश्यक सुविधा आणि मनुष्यबळाचा अभाव आहे. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता घसरत असल्याचे चित्र आहे. म्हणून विद्यापीठाने ११ जूनपासून सर्व पदव्युत्तर महाविद्यालयांची प्रत्यक्ष तपासणी करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी ३० पथकांची स्थापनाही करण्यात आली आहे. या पथकांच्या अहवालानंतर संबंधित महाविद्यालयांच्या प्रवेश क्षमतेबद्दल निर्णय घेण्यात येणार आहे.
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव हे चार जिल्ह्ये येतात. या जिल्ह्यांमधील सुमारे ४७६ महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्नित आहेत. यातील १९६ महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमही आहेत. परंतु पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अनेक महाविद्यालयांमध्ये कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाहीत. मान्यताप्राप्त पदव्युत्तर शिक्षक नाही. पुरेशा विज्ञान प्रयोगशाळा, वर्गखोल्या, ग्रंथालये, संगणक प्रयोगशाळा या सुविधाही नाहीत. तरीही अशा महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवेश होत आहेत. परिणामी, त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे.
म्हणून आता विद्यापीठाने सर्वच पदव्युत्तर महाविद्यालयांची प्रत्यक्ष तपासणी करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी ३० पथके स्थापन करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात विद्यापीठातील एक आणि बाहेरच्या विद्यापीठाचा एक असे दोन सदस्य असणार आहेत. ही तपासणी ११ जूनपासून सुरू होणार आहे. आठ दिवसांत सर्व महाविद्यालयांची तपासणी होऊन त्याचा अहवाल सादर होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
विद्यापीठ कॅम्पसमध्ये पदव्युतरचे ४३ विभाग आहेत. या ठिकाणी सर्व सुविधा असूनही गतवर्षी विद्यापीठात प्रवेश क्षमतेच्या ६० टक्केही प्रवेश झाले नव्हते. त्या तुलनेत ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये कोणत्याही सुविधा नसताना मोठ्या प्रमाणावर प्रवेश झाले. ग्रामीण भागातील या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून देण्याची हमी घेतली जात असल्याने आणि तासिकांसाठी हजर राहण्याची गरज नसल्याने विद्यार्थी या महाविद्यालयांना पसंती देत असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच विद्यापीठ प्रशासनाने याला आळा घालण्यासाठीच तपासणीचे हे पाऊल उचलले असल्याचे समजते.
विद्यापीठाकडून नियुक्त पथके ११ जूनपासून तपासणीला सुरुवात करतील. या पथकांना तपासणीसाठी सहा मुद्दे देण्यात आले आहेत. यामध्ये इमारत, संगणक प्रयोगशाळा, विज्ञान प्रयोगशाळा, मान्यताप्राप्त शिक्षक, ग्रंथालय आदींचा समावेश आहे. तपासणी अहवाल प्राप्त झाल्यावर, ज्या महाविद्यालयांमध्ये या गोष्टी नसतील, तर त्यांची प्रवेशक्षमता शून्य करण्यात येणार असल्याचेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.