

Notice issued to 3 petrol pumps near historical sites
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील ऐतिहासिक वास्तूंपासून शंभर मीटरच्या परिसरात बेकायदा सुरू असलेल्या पेट्रोल पंपांबाबत पुरातत्व वास्तू संवर्धन तथा संरक्षण कृती समितीने जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यानंतर आता अग्निक्षमन विभागाने तीन पेट्रोल पंपांना नोटीस बजावल्या असून, सात दिवसांत म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे.
पुरातत्व वास्तू संवर्धन तथा संरक्षण कृती समिती अध्यक्ष वाजेद असलम यांनी २७ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार केली होती. यात म्हटले होते की, शहरामध्ये राज्य पुरातत्व विभागाच्या यादीमधील जवळपास १५४ ऐतिहासिक वारसा स्थळे आहेत. मात्र यातील अनेक वारसा स्थळांशेजारी अवैधरीतीने बांधकाम झाल्याचे दिसून येत आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाशेजारी दिल्लीगेट ही ऐतिहासिक वास्तू आहे.
या वास्तूशेजारी दोनशे मीटरच्या जवळ पेट्रोल पंप सुरू आहे. ही कायद्याची विटंबना आहे. या पंपाला अग्निशमनचे ना हरकत प्रमाणपत्रही नाही. शहागंज येथील मशीदही पुरातत्वच्या यादीत आहे. या मशिदीलगतच दोन पेट्रोल पंप वर्षानुवर्ष सुरू आहेत. महापालिका मुख्यालयाशेजारी टाऊन हॉल ही ऐतिहासिक वास्तू आहे. तिथेही जवळच पेट्रोल पंप आहे. याशिवाय शहरातील इतर काही ऐतिहासिक वास्तूंशेजारी अशाच पद्धतीने नियमबाह्यरीत्या निर्माण झालेले आहे.
महापालिकेचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे दिल्लीगेट, शहागंज, जाफरगेट व टाऊन हॉल शेजारील पेट्रोल पंपांचे परवाने रद्द करून ऐतिहासिक इमारतींचे संरक्षण करण्यात यावे, असेही यात म्हटले आहे. या तक्रारीनंतर आता अग्निशमन विभागाने तीन पेट्रोल पंपांना नोटीस बजावल्या आहेत.
या पेट्रोल पंपांना नोटीस
टाऊन हॉल येथील पेट्रोल पंपचालक मिर्झा कैसर बेग, दिल्लीगेट येथील पेट्रोल पंपचालक एन. ए. प्रिंटर आणि शहागंज येथील पेट्रोल पंपचालक रुमी प्रिंटर यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. आपल्या पंपामुळे काही दुर्घटना घडल्यास जीवित व वित्तीय हानी होऊन अतोनात नुकसान होऊ शकते. त्यामुळे आपल्या पंपाचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द का करण्यात येऊ नये, यासंदर्भात सात दिवसांत आपले म्हणणे सादर करावे, असे यात म्हटले आहे.