

I Love Mohammad vs I Love Mahadev
छत्रपती संभाजीनगर : आय लव्ह महंम्मदला उत्तर हे आता आय लव्ह महादेवच्या बॅनरने द्या. ही महादेवाची पावण भूमी आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक गल्ल्या आणि घरांमध्ये आय लव्ह महादेवचीच पोस्टर लावा, महंम्मदवाल्यांना पाकिस्तानमध्ये पाठवा, असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी (दि.३) छत्रपती संभाजीनगर विमानतळावर केले. फुलंब्रीत अतिवृष्टीमुळे मत्स्य व्यवसायिकांचे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते शहरात आले होते.
यावेळी फुलंब्रीच्या आमदार अनुराधा चव्हाण, शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, सुहास शिरसाट, माजी उपमहापौर प्रमोद राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. शहराच नव्हे तर राज्यात सध्या विविध ठिकाणी आय लव्ह महंम्मदची पोस्टर लागत आहेत. त्यावरुन जातीय तेड निर्माण होत आहे. यावर बोलतांना मंत्री राणे म्हणाले की, ही महादेवाची भूमी असून हिंदूंनी येथे आल लव्ह महादेवचीच पोस्टर लावली पाहिजेत. जो कोणी आय लव्ह महंम्मदचे पोस्टर लावत असेल त्याला पाकिस्तानला पाठवा, हवे तर मी त्याला कचराच्या विमानाची तिकीटे काढून देतो, असेही ते म्हणाले.
दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत रामदास कदम यांनी उपस्थित केलेल्या सवालावर राणे म्हणाले की, कदम यांचा बाण अतिशय योग्य दिशेने जात आहे. स्विज्झर्लंडवरुन कोण आले, हे उद्धव ठाकरे यांनी सांगावे. ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या नुकसानीवर पहिला मोर्चा मातोश्रीवर काढावा, मुख्यमंत्री असतांना त्यांनी ना चांदावर ना बांधावर काहीच दिले नसल्याचा आरोप राणे यांनी केला. संभाजीनगर दौऱ्यावर बोलांतना ते म्हणाले की, मत्स्य व्यवसाय मंत्रालयाकडून राज्यात अतिवृष्टीमुळे ज्या ठिकाणी मत्स्य तळांचे नुकसान झाले, त्याची पाहणी करुन मदतीसाठी अहवाल तयार केला जात आहे. दोन दिवसांपूर्वीच्या अहवालानुसार २८ कोटींचे नुकसान आतापर्यंत झाले असून फुलंब्री तालुक्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलोय, असेही ते म्हणाले.
दसरा मेळाव्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत मंत्री नितेश राणे म्हणाले, मग शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी लावलेल्या वटवृक्षावर उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेसी गांजा उगवलाय, असे आम्ही म्हणावे का?
भाजपने अगोदर त्यांच्या झेंड्यातील हिरवा रंग काढावा. मग हिंदूत्वावर बोलावे असे उद्धव ठाकरे म्हणाले, त्यावर राणे म्हणाले की, ज्यांचे स्वत:च्या राजकीय धर्मांतर झाले आहे. त्यांनी आम्हाला हिंदुत्त्व शिकवू नये, मुळात ज्यांची सकाळ, दुपार आणि रात्र ही मुल्ला आणि मौलवींच्या शिवाय होत नाही. त्यांनी आम्हाला मूळीच हिंदूत्त्वाचे सर्टिफिकेट देऊ नये. अन् ठाकरेंनी तर मुळीच सर्टिफिकेट वाटू नये, असेही ते म्हणाले.