मच्छीमारांना आर्थिकद़ृष्ट्या सक्षम करणार : ना. नितेश राणे

मिरकरवाडा बंदरासाठी आणखी 36 कोटींचा प्रस्ताव तयार : पालकमंत्री डॉ. उदय सामंत
Ratnagiri News
मच्छीमारांना आर्थिकद़ृष्ट्या सक्षम करणार : ना. नितेश राणे
Published on
Updated on

रत्नागिरी : मच्छीमार बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि कोकण किनारपट्टीचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी आम्ही अतिक्रमणासारख्या कठोर निर्णयांचीही भीती बाळगली नाही. आता या बंदराच्या आणि पर्यायाने इथल्या मच्छीमारांच्या विकासासाठी चांगल्या दर्जाची कामे केली जातील, असा विश्वास मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला, तर मिरकरवाडा बंदर विकासासाठी आणखी 36 कोटींचा प्रस्ताव तयार असल्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.

मिरकरवाडा बंदराच्या दुसर्‍या टप्प्याच्या विकास प्रकल्पाचे भूमिपूजन रविवारी झाले. यावेळी मत्स्य विकास आयुक्त किशोर तावडे, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, माजी जि. प. सदस्य बाबू म्हाप आदी उपस्थित होते. बंदरे मंत्री ना. राणे म्हणाले, आम्ही कोकण किनारपट्टीच्या सशक्तीकरणाच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली. त्यामध्ये मिरकरवाडा बंदराचा विकास आमच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा होता. मात्र, इथे अतिक्रमणाच्या अडचणी समोर आल्या. काहींनी आमच्याबद्दल तीव्र गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला. पण, आम्ही ठाम राहिलो आणि त्यामुळेच आजचा दिवस उजाडला आहे. येथील प्रत्येक नागरिकाचे भविष्य घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. दुसर्‍या टप्प्यात विविध विकासकामांचा समावेश असून, बंदराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी साठवण क्षमता, बर्फ कारखाने, सांडपाणी व्यवस्था, मासेमारीची यंत्रणा आणि इतर सोयी सुविधा यांचा समावेश आहे. इथले अतिक्रमण हटवताना पालकमंत्री डॉ. सामंत यांनी केलेल्या सहकार्याचा आवर्जून उल्लेख करत त्यांचे या विकास प्रक्रियेकडे लक्ष असून लवकरच तिसर्‍या टप्प्यातील विकासासाठी सज्ज राहणार आहोत, असे ते म्हणाले. आजचा हा विकास द़ृष्टीकोन मच्छीमार समाजाच्या भविष्यासाठी महत्त्वाचा आहे, असेही ना. राणे यांनी सांगितले.

पालकमंत्री ना. सामंत म्हणाले, मिरकरवाड्याचा विकास व्हावा, यासाठी गेली वीस वर्षे झगडतोय. पण, तो होण्यासाठी कोकणच्या सुपुत्रालाच मंत्री व्हावं लागलं. या बंदराच्या विकासासाठी 22 कोटींचा दुसरा टप्पा सुरू झाला असून, 36 कोटींचा आराखडा विभागाने तयार केला आहे. यातूनच इथल्या मच्छीमारांना समृद्धीची नवी दिशा मिळणार आहे. मंत्री राणे यांनी या बंदर विकासाचा संकल्प केला. त्यांच्यामुळेच आज मच्छीला कृषीचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे मिरकरवाडा भविष्यात राज्यातील सर्वाधिक उत्पन्न देणारे बंदर ठरेल, याचा मला विश्वास आहे. त्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. अशावेळी अवैध मासेमारीला आळा घालतानाच आमचा छोटा मच्छीमारही मोठ्या मच्छीमारासारखाच जगला पाहिजे. हीच आमची भूमिका आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले, कोकणचा सुपुत्र मत्स्य व्यवसायासाठी जीव ओतून काम करतो, हे कोकणासाठी भाग्य आहे. नाटे आणि हर्णे बंदरासाठी 200 कोटींचा निधी मंजूर झाला असून, भविष्यात मिरकरवाडा मलपीपेक्षा मोठं बंदर होईल, यात दुमत नाही. त्यामुळेच माझ्या मतदारसंघात होणार्‍या मत्स्य विकासासाठी, मच्छीमारांचं भवितव्य घडवण्यासाठी माझे नेहमीच सहकार्य असेल, असेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news