

Nillod project overflows, water level at 13 percent
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील प्रकल्पामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. निल्लोड प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. खेळणाचा पाणीसाठा १३, तर अजिंठा अंधारीचा साठा १९ टक्क्यांवर आला आहे. केळगाव प्रकल्प भरण्याच्या मार्गावर असून ८० टक्के धरण भरले आहे.
तालुक्यात सलग चार दिवस झालेल्या पावसामुळे जलसाठ्यांची पाणी पातळी वाढली आहे. केळगाव, आधारवाडी परिसरात दमदार पाऊस झाल्याने केळगाव लघु प्रकल्प ८० टक्के भरला. खेळणा नदीला पूर आल्याने खेळणा प्रकल्पाची पाणी पातळी १३ टक्क्यांवर पोहचली आहे.
जोत्याखाली असलेला अजिंठा-अंधारीत पाण्याची आवक वाढल्याने १९ टक्के पाणीसाठा झाला आहे. केळगाव प्रकल्प ओव्हरफ्लो झाला की, पाण्याची आवक वाढून खेळणाची पातळी झपाट्याने वाढते. उंडणगाव, रहिमाबाद साठवण तलाव अद्यापही जोत्याखालीच आहे. तर चारनेर पेंडगावमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. सलग चार दिवस तालुक्यात पाऊस झाल्याने पूर्णा, अंजना नद्या मनसोक्त वाहत आहे. या नदीकाठावरील गावांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून नदीकाठावरील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खेळणा, चारनेर - पेंडगाव, अजिंठा-अंधारीसह उंडणगाव, रहिमाबाद साठवण तलाव भरण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे.
तालुक्यात पावसाने जवळपास सरासरी गाठली. असे असले तरी निल्लोड प्रकल्प वगळता अद्याप एकही प्रकल्प भरलेला नाही. तालुक्यात आतापर्यंत सरासरी ४४६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यात सिल्लोड मंडळात २९९ मि.मी. पाऊस झाला. भराडी ४०४, अंभई ५२६, अजिंठा ४०६, गोळेगाव ५६७, आमठाणा ४६९, निल्लोड ५२७, तर बोरगाव बाजार मंडळात ४३४ मि.मी. पाऊस झाला.
निल्लोड प्रकल्प गेल्यावर्षी कोरडा पडला होता. मात्र यंदा तालुक्यात अवकाळी पावसाचा मुक्काम वाढला होता. निल्लोड परिसरात अवकाळी दमदार बरसल्याने भर उन्हाळ्यात यात पाण्याची आवक सुरू झाली होती. तर यंदा निल्लोड मंडळात वरुणराजाची मेहेरबानी राहिल्याने हा प्रकल्प तालुक्यातील इतर प्रकल्पाआधीच ओव्हरफ्लो झाला आहे. पाण्याची आवक कमी असल्याने हा प्रकल्प सहजासहजी भरत नाही. हा प्रकल्प भरल्याने निल्लोड, कायगाव, बनकिन्होळा, गेवराई सेमी, केहऱ्हाळा आदी गावांचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे.