

New fraud funda: 24 carat gold in 93 thousand
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : २२ कॅरेट सोन्यात चांदी मिसळून ते २४ कॅरेट म्हणून अवघ्या ९३ हजारांत १ तोळा सोने विक्री करण्यासाठी आशीर्वाद गोल्ड नावाने ऑफिस थाटून बसलेल्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. नागरिकांना ९३ हजारांत घेऊन जा आणि १ लाखात विक्री करून ७ हजारांचा नफा कमवा, अशी फसवाफसवीची जाहिरात रिलस्टारच्या मदती करून तो व्हिडिओ व्हायरल केला होता.
आनंदकुमार नामदेवराव मगरे (३७, रा. पावन गणेश मंदिरासमोर, राजुरकर निवास, नारळीबाग), दीपक गौतम आढावे (३१, रा. नामांतर कॉलनी, सिद्धार्थनगर, एन १२ हडको), जयपाल कन्हैयालाल धर्मानी (४९, रा. रणजितनगर, काल्डा कॉर्नर) आणि रीलस्टार सुशील प्रभू बाघमारे (२४, रा. श्रीकृष्णनगर, उल्कानगरी) अशी आरोपींची नावे असल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी आनंदकुमार मगरेला धर्मानी याने सोने विक्रीचा फंडा सांगितला. त्यासाठी मगरे याने आढावेला सोबत घेतले. स्वतःच्या इमारतीत नारळीबाग येथे खालच्या मजल्यावर दोघांनी आशीर्वाद गोल्ड नावाने ऑफिस सुरू केले. २४ कॅरेट सोने खरेदी करून त्यामध्ये चांदी मिक्स करून २२ कॅरेट सोने हे ग्राहकांना २४ कॅरेट म्हणून विक्री करू, २२ कॅरेट सोने हे आपल्याला ९ हजार १०० ग्रॅमच्या भावाने भेटेल ते आपण ग्राहकांना ९ हजार ३०० रुपये ग्रॅमने विक्री करू. ग्राहकाने ते विकले की, त्याला १० हजार रुपये ग्रॅम मागे भेटतील. म्हणजेच त्याचा फायदा हा ७०० रुपये ग्रॅम मागे होईल.
परंतु त्यास सदर सोने हे २२ कॅरेट आहे असे सांगायचे नाही, आयडी यावर टाकला. तो व्हायरल होताच गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांनी उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांना खात्री करून कारवाईच्या सूचना दिल्या. पीएसआय वाघ यांनी पडताळणी केली तेव्हा तो फसवणुकीचा प्रकार असल्याचे दिसून आल्याने त्यांनी चौघांना ताब्यात घेऊन सिटी चौक पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३ हजारांसाठी रील करणे पडले महागात
रीलस्टार सुनील बाघमारे याने तिघांकडून ३ हजार रुपये घेऊन आशीर्वाद गोल्डची जाहिरात केली. लोकांची फसवणूक होईल, असा व्हिडिओ व्हायरल केला. त्यामुळे त्यालाही यात आरोपी करून ताब्यात घेण्यात आले आहे. या टोळीकडून किती लोकांची फसवणूक झाली हे अद्याप समोर आलेले नाही.