

Network Smuggling Ganja from Odisha into the City Exposed
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा नारेगाव परिसरात एमआयडीसी सिडको पोलिसांच्या विशेष पथकाने रचलेल्या सापळ्यातून ओडिशा राज्यातून आणलेला गांजा जळगावपर्यंत पुरवण्याचे जाळे उघडकीस आले. ५३ किलो ४४१ ग्रॅम गांजासह ३१ लाख ७२ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी बिदेश ऊर्फ विदेश सुरेश माचरे (३८, रा. नारेगाव) याला बेड्या ठोकल्या.
१० एप्रिल रोजी दुपारी नारेगाव परिसरात एका कारमधून मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री होणार असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली. त्यानुसार, पथकाने परिसरात सापळा रचत संशयित फियाट कारला (एमएच-२०-बीसी ९५९७) थांबवून चालक बिदेश ऊर्फ विदेश सुरेश माचरे याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. चौकशीत त्याने गांजा ओडिशा राज्यातून आणला असल्याची कबुली दिली. त्याच्याकडून २६ लाख ७२ हजार ५० रुपये किमतीचा ५३ किलो ४४१ ग्रॅम गांजा आणि ५ लाख रुपये किमतीची फियाट कार असा ३१ लाख ७२ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई निरीक्षक सोमनाथ जाधव, सहायक निरीक्षक भरत पाचोळे, कैलास लहाने, हवालदार संतोश सोनवणे, संजय नंद, प्रकाश सोनवणे, संतोष गायकवाड, परशुराम सोनुने, अरविंद पुरी, रतन नागलोत, योगेश म्हस्के, केवलसिंग गुसिंगे आदींनी केली.
कुटुंबीयांवरही संशय
माचरे याच्या पत्नीविरोधात यापूर्वी गांजा विक्रीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात कुटुंबीयांचा सहभाग होता का, याचाही तपास सुरू करण्यात येत आला
जळगावपर्यंत विक्री
माचरे हा जळगाव येथील आकाश दहियेकर याच्यासह किशोर हटकर व राहुल मलके या तिघांना गांजा विक्री करण्याच्या तयारीत होता. या माध्यमातून संभाजीनगर ते जळगाव असा गांजाचा सप्लाय चेन तयार केली होती. या तिघांमार्फत पुढे किरकोळ विक्री होणार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. रेड्डीसह इतरांचा शोध पोलिस घेत आहेत.