

Navratri festival begins in a grand devotional atmosphere
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : उदे ग अंबे उदे, जय जगदंबे, दुर्गा माता दुगा माता की जय...च्या गजरात सोमवारी (दि.२२) घरोघरी आणि कर्णपुरासह विविध माता मंदिरात घटस्थापना करून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. यानिमित्त पहाटे ३ वाजेपासून भाविकांनी गर्दी केली होती. भरपावसातही मंदिराबाहेर दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या. पावसाच्या सरी अंगावर घेत देवीच्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले.
नवरात्रोत्सवानिमित्त पहाटे लवकर उठून महिलांनी घराबाहेर सडा रांगोळ्या काढल्या. पारंपरिक पद्धतीने देवीची पूजा-आराधना करत घटस्थापना करण्यात आली. यासह शहरातील कर्णपुरा येथील आई तुळजाभवानी मंदिर, हडको येथील रेणुकामाता मंदिर आणि हर्मूल येथील हरसिद्धीमाता मंदिरातही पहाटे देवीच्या जयघोषात घटस्थापना करण्यात आली. सुमारे साडेतीनशे वर्षांच्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कर्णपुरा मंदिरात यानिमित्त दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी केली.
सकाळी माजी विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. सनई-चौघडा, टाळ-मृदंगांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने देवीची आरती करण्यात आली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, किशोर कछवाह यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. पहिल्या माळेपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली. महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती.
बीड बायपास येथील रेणुकामाता मंदिर, हडको एन- एन-९ येथील रेणुकामाता मंदिर, हसूल येथील हरसिद्धीमाता मंदिर, आकाशवाणी येथील दुर्गामाता मंदिर, टिळकपथ येथील शीतलामाता मंदिर, रंगारगल्ली येथील हिंगलाजमाता मंदिर येथेही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. पहाटेपासूनच मंदिराबाहेर रांगा लागल्या. विविध मंदिर व्यवस्थापनाकडून दर्शन रांगांची व्यवस्था करण्यात आली.
दरवर्षी नवरात्रोत्सवात कर्णपुरा मंदिर परिसरात मोठी जत्रा भरते. मंगळवारी नवरात्रोत्सवासोबतच जत्रोत्सवालाही सुरुवात झाली. यासाठी आठवड्याभर आधीपासूनच व्यापारी, व्यावसायिकांची लगबग सुरू होती. सात रहाटपाळण्यासह डान्स झुला आणि विविध खाद्यपदार्थांची दुकाने थाटण्यात आली आहेत. भाविकांच्या गर्दीने पहिल्या माळेपासूनच यात्रा परिसर गजबजून गेला. दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी सुरू होती.