काला दहीहंडी फोडून सांगता

नाथषष्ठी : पैठणनगरीत भानुदास एकनाथचा गजर; लाखो वारकऱ्यांनी घेतला निरोप
Paithan news
काला दहीहंडी फोडून सांगताfile photo
Published on
Updated on

Nath Shashthi: Bhanudas Eknath's alarm in Paithan city; Lakhs of Warkari bid farewell

पैठण, पुढारी वृत्तसेवा: कंठी धरिला कृष्णामणी, अवघा जनी प्रकाश... काला वाटू एकामेका... या अभंगाच्या गजरात आणि कालाष्टमीच्या मुहूर्तावर बुधवारी (दि.११) सूर्यास्तासमयी नाथसमाधी मंदिरात काला दहीहंडी फोडण्यात आली. या भक्तिपूर्ण सोहळ्याने तीनदिवसीय श्री संत एकनाथ महाराज नाथषष्ठी यात्रोत्सवाची मोठ्या उत्साहात सांगता झाली. यावेळी भानुदास एकनाथच्या जयघोषाने अवघी पैठणनगरी दुमदुमून गेली होती.

Paithan news
Sambhajinagar News : बारा अधिकाऱ्यांना शो-कॉज, गैरहजर कर्मचाऱ्यांची वेतन कपात

मंदिर विश्वस्त मंडळाच्या वतीने मंदिराबाहेरील काला दहीहंडीचा मान अहिल्यानगर जिल्ह्यातील (आठवड) पारंपरिक ज्येष्ठ वारकरी रंगनाथ पिराजी चोथे यांना देण्यात आला. त्यांच्या हस्ते आणि मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा आमदार विलास भुमरे, कार्यकारी विश्वस्त दादा पाटील बारे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही हंडी फोडण्यात आली.

तर नाथसमाधी मंदिरातील गाभाऱ्यातील दहीहंडी नाथवंशज रावसाहेबबुवा गोसावी यांच्या हस्ते फोडण्यात आली. यावेळी काल्याचा प्रसाद मिळवण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी करत एकच धावपळ केली. नाथ संस्थानच्या वतीने मंदिरासमोरील डोममध्ये आमदार विलास भुमरे यांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वर महाराज कदम (आळंदीकर) यांचे सुश्राव्य काल्याचे कीर्तन झाले.

Paithan news
Verul Caves : वेरूळ लेण्यांतील बुद्धमूर्तीवर किरणोत्सव

तत्पूर्वी, नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी, ज्ञानेश महाराज गोसावी, संस्थानाधिपती रावसाहेब महाराज, पुष्कर महाराज, योगीराज महाराज आणि विनीत महाराज गोसावी यांनी गावातील नाथ मंदिरातून वाळवंटमार्गे मानाची दिंडी काढली. वारकऱ्यांनी हरिनाम गजर करत टाळ-मृदंगांच्या तालावर पावल्या खेळून भक्तीचा आनंद लुटला.

या सोहळ्याला विठ्ठल महाराज चनघटे, नगराध्यक्षा विद्याभूषण कावसानकर, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांच्यासह महावितरण, सार्वजनिक बांधकाम आणि महसूल विभागाचे अधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आम्ही जातो आमुच्या गावा...

सलग तीन दिवस पैठणमध्ये भक्तीच्या सागरात डुंबून निघालेल्या शेकडो दिंड्या आणि वारकऱ्यांनी बुधवारी सकाळपासून आपापल्या फडावर कीर्तन करत काल्याचा प्रसाद घेतला. नाथांच्या चरणी नतमस्तक होऊन धन्य झाल्याची भावना वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होती. जातो माघारी नाथा... तुझे दर्शन झाले आता... आणि आम्ही जातो आमुच्या गावा... आमुचा रामराम घ्यावा... असे अभंग गात वारकऱ्यांनी एकमेकांचा निरोप घेत आपापल्या घराची वाट धरली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news