

Nalkandi bridge in Sayyadpur washed away
लाडसावंगी, पुढारी वृत्तसेवा : अंजनडोहहून उगम पावणाऱ्या दुधना नदीला जोरदार पाऊस झाल्यामुळे १५ ऑगस्ट रोजी पूर आला, त्यामुळे सय्यदपूरकरांची पुन्हा तारांबळ उडाली आहे, कारण सय्यदपूरला गावात जाणाऱ्या रस्त्यावर पुलाचे काम चालू आहे, काम चालू असल्यामुळे काम करणाऱ्या ठेकेदाराने पर्यायी व्यवस्था म्हणून बाजूलाच नळकांडी पूल टाकून दिला होता, परंतु याअगोदर एकदा व काल पुन्हा दुसऱ्यांदा पूल वाहून गेल्यामुळे गावकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे.
सय्यदपूरकरांची लाडसावंगी येथे दररोज ये जा असते कारण, लाडसावंगी हे बाजारपेठेचे गाव आहे, शालेय विद्यार्थ्यांना दररोज शालेय शिक्षणासाठी, शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते खरेदीसाठी, रुग्णांना दवाखान्याची, दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांना डेअरीला दूध टाकण्यासाठी दररोज यावे लागते.
खा. डॉ. कल्याण काळे व आ. अनुराधा चव्हाण यांच्याकडे गावकऱ्यांचा पाठपुरावा सुरू असुन या दोघांनीही आम्हा गावकऱ्यांना मदत करून पुलाचे काम त्वरित मार्गी लावावे, अशी मागणी सय्यदपूरचे माजी सरपंच राजेंद्र शेळके, चेअरमन विजय काळे, प्रभाकर शेळके, संतोष गवारे, कौतिक डवणे, विजय गवारे, भूषण शेळके, सचिन शेळके आदींनी केली आहे.