

छत्रपती संभाजीनगर : बाहेरील आऊटर मुले कॉलेजमध्ये येऊन चाकू दाखवून मोबाईल नंबर मागतात. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरेही फोडले. मुख्य गेट बंद केले तरी हे मुले उड्या मारून येतात. सुरक्षा रक्षक, वॉचमन याकडे लक्ष देत नाही, इतकेच नव्हे तर काही शिक्षकही उद्धट बोलतात. अशी गंभीर आपबित्ती नाईक महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी मांडल्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत प्राचार्य संजीव रेड्डी यांना २४ तासांत सर्व समस्या सोडवा, अन्यथा गाठ मनसेशी आहे, सज्जड इशारा दिला.
मनसेच्या सदस्य नोंदणी अभिया नासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे सोमवारी (दि. २४) छत्रपती संभाजीनगर शहराच्या दौऱ्यावर आले होते. दिवसभरात त्यांनी शहरातील विविध महाविद्यालयांना भेटी देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सिडको येथील वसंतराव नाईक महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या तोंडून त्यांची भयानक आपबिती ऐकल्यानंतर अमित ठाकरे भडकले.
स्वच्छतागृहाची दुरवस्था, सॅनिटरी मशीन नाही, लॅबररी बंद असते. अशा तक्रारींचा पाढा विद्यार्थिनी वाचला. गंभीर बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच बाहेरील मुलाने चाकूचा धाक दाखवून नंबर मागितल्याचा प्रकार आपल्या सोबत घडल्याचे एका विद्यार्थिनीने सांगितले. याची तक्रार केली होती, तेव्हा तुला शिकायचे नाही का? कॉलेज बंद पडेल. असे सांगत शिक्षकांनी गप्प बसवल्याचेही तिने सांगितले.
प्राचार्य संजीव रेड्डी यांच्या दालनातच हा प्रशासकीय अनास्थेचा भंडाफोड सुरू होता. शेवटी विद्यार्थिनींच्या समस्या ऐकून संतापलेल्या अमित ठाकरे यांनी पोलिसांना फोन लावून महाविद्यालयातील सुरक्षेकडे लक्ष देण्याचे सांगितले. तर प्रशासकीय स्तरावरील समस्या २४ तासांत सोडवाव्यात, अशा सूचना प्राचार्यांनी केल्या. यावेळी मनविसेचे राज्य सरचिटणीस राजीव जावळीकर, राज्य उपाध्यक्ष मंगेश साळवे, मनसेचे बिपीन नाईक, सतनामसिंग गुलाटी, अशोक पवार यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
... अन्यथा मी पुन्हा येईल
एमजीएम जेएनईसी येथेही भेट देत अमित ठाकरे यांनी तेथील विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. त्यांच्या वसतिगृहाच्या, जेवनाच्या, फी आणि इतर शैक्षणिक अडचणी जाणून घेत त्या तातडीने सोडवण्याच्या प्रशासनाला सूचना केल्या. अन्यथा मी पुन्हा येईन, असा इशाराही त्यांनी दिला.
बजाजनगरात ठाकरेंचा विद्यार्थ्यांशी संवाद
वाळूज महानगर : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी सोमवारी (दि. २४) बजाजनगर येथील हायटेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत पक्षाची ध्येय-धोरणे व भविष्यातील वाटचालीची माहिती दिली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी डेव्हलपमेंट फी, कँटीन व हॉस्टेलच्या समस्या मांडल्या. यावर संस्थेचे पदाधिकारी अमन जाधव व प्राचार्य ढगे यांच्याशी चर्चा करून विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी महाविद्यालय व्यवस्थापन व पदाधिकाऱ्यांची लवकर बैठक घेण्याच्या सूचना अमित ठाकरे यांनी केल्या.