

पिशोर : महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबिटकर यांचे ओएसडी तथा सार्वजनिक आरोग्य विभागाचे राज्य नोडल अधिकारी, आयुक्तालय मुंबईचे डॉ. स्वप्निल विजय सांगळे आणि आमदार संजनाताई जाधव यांनी नाचनवेल प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली. यावेळी स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थांकडून आरोग्य केंद्रातील समस्या, रुग्णांच्या अडचणी आणि आरोग्य विभागाच्या कामकाजाबाबत माहिती जाणून घेतली.
यावेळी संतप्त ग्रामस्थांनी आरोग्य केंद्रातील गैरसोयींचा पाढाच अधिकाऱ्यांसमोर वाचला. केंद्रात आवश्यक औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांना अनेकदा बाहेरील मेडिकलमधून औषधे खरेदी करावी लागत असल्याची तक्रार करण्यात आली. तसेच विविध पदे रिक्त असून, डॉक्टर व कर्मचारी नियमितपणे उपलब्ध राहत नसल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.
कर्तव्यावर असलेले डॉक्टर व कर्मचारी वेळेवर हजर राहत नसल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. महिला रुग्णांसाठी महिला डॉक्टर नियमित उपलब्ध नसल्यानेही अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी साळुंके, जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पवार, पंचायत समिती सदस्य पती जगन जंगले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी थोरात, ज्ञानेश्वर निकम, माजी सरपंच मोहरा राजेंद्र गाडेकर, धीरज धुमाळ, रावसाहेब शिंदे, विशाल थोरात, एकनाथ लेणेकर, गणेश जंगले, अकबर शहा, विठ्ठल जंगले, जनार्धन बनकर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वच्छतेचा प्रश्नही ऐरणीवर
आरोग्य केंद्राच्या स्वच्छतेबाबतही ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. परिसरात पुरेशी स्वच्छता नसणे, स्वच्छतागृहे नादुरुस्त असणे आणि रुग्ण व नातेवाइकांसाठी पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. प्रसूती कक्षाची दुरवस्था असून, आवश्यक सुविधा व उपकरणांची कमतरता असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. ग्रामीण भागातील महिलांना प्रसूतीसाठी वेळेवर आणि योग्य आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.