

My friend has a car, I don't, and he left home.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
आई रागावली किंवा मोबाईल, नवीन ड्रेसची मागणी करताच आई-वडिलांकडून ती पूर्ण झाली नाही तर मुले सरळ घर सोडत आहेत. असेच एका मुलाने मित्राकडे गाडी आहे, परंतु माझ्याकडे गाडी नाही. मला गाडी घेऊन द्या, असा तगादा आई-वडिलांकडे लावला. ती इच्छा पूर्ण झाली नसल्याने त्याने चक्क घर सोडले. या वर्षभरात सुमारे १८२ जणांनी घर सोडून रेल्वे गाठल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्दही करण्यात आले.
किरकोळ कारणासाठी घर सोडून रेल्वे गाठणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यात अगदी १० वर्षांपासून १७ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींचा समावेश आहे. अशा मुलांना शोधण्याचे काम रेल्वे प्रवासी सेना, लोहमार्ग पोलिस, रेल्वे सुरक्षा दल, ग्रामीण आणि शहर पोलिस करत असून, ते सापडल्यानंतर त्यांना समज देऊन पालकांच्या स्वाधीन करण्यात येते. वर्षभरात नांदेड विभागातील विविध भागांतून या मुलांनी घर सोडले होते. त्यांचा शोध घेतल्यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले असल्याची माहिती रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी दिली.
फिरायला जाण्यासाठी हट्ट
रुसून आलेल्या मुलांची कारणे क्षुल्लक आणि आश्चर्यकारक आहेत. मुले छोट्या छोट्या बाबींवर वाद करण्याच्या वा टोकाचा निर्णय घेत असल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.
एकाने मित्रासोबत माझ्यापेक्षा एक मार्क जास्त घेतला तर एकाने आपल्याला मित्रांसोबत फिरायला जाण्यासाठी नकार मिळाला, तर काही मुले आईला घरातील कामांत मदत न केल्याने आई रागावली तर काही अल्पवयीन मुलींही आपल्याला हिरोईन व्हायचे म्हणून त्यांनी थेट रेल्वे गाठली होती. याशिवाय काही मुले, मुली नवीन ड्रेस, स्कूटी, मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून घर सोडल्याचे समोर आले आहे. बारावीचे वर्ष असताना अभ्यास सोडून सतत मोबाईल पाहत असल्याने वडील रागवताच मुलाने रागाच्या भरात घर सोडले.
घरच्यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला परंतू तो सापडला नव्हता. काळजीत असलेल्या घरच्यांना तो चुलत भावाकडे असल्याचे माहित झाल्यानंतर त्यांच्या जिवात जिव आला तोपर्यंत मात्र त्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते.
संवाद हरवल्याने घटनांत वाढ
आज पालक आणि मुले यांच्यातील संवाद कमी झाला आहे. त्यामुळे मुलांच्या अडचणी समजून घेण्यात पालक कमी पडत आहेत. यातूनच मुले वेगळ्या वळणाला लागून थेट घर सोडण्याचा निर्णय घेत आहेत. यासाठी मुलांशी संवाद वाढवणे गरजेचे असल्याचे मत तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
मोबाईल, टिव्हीच्या जमान्यात पालक मुलांत संवाद हरवत चालला आहे. प्रत्येक जण सोशल मिडियावर सक्रिय असला तर परस्पराशी संवाद साधण्यात मात्र त्यांना वेळ नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. काही वेळा पालकांच्या आपल्या पाल्यांकडून प्रचंड अपेक्षा असतात. त्या अपेक्षांच्या ओझ्याखाली त्याचे बालपण हरवत चालले आहे. काही वेळा पालकांचे दुर्लक्ष अशा घटनांना कारणीभूत ठरत आहे.