

School buses inspected by RTO teams
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : विनापरवाना स्कूलबस तसेच विनाफिटनेस स्कूलबस विद्यार्थ्यांची वाहतूक करत असल्याच्या तक्रारी वाढल्याने गुरुवार (दि.१८) पासून आरटीओच्या पथकाने तपासणी सुरू केली. पहिल्याच दिवशी १२ स्कूलबस जप्त करण्यात आल्या आहेत. कारवाई टाळण्यासाठी सर्व कागदपत्रे अपडेट करूनच रस्त्यावर उतरावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी केले आहे.
स्कूलबस प्रकरणी आलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत आरटीओ कार्यालयाने वायुवेग पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. या सुचनेनुसार गुरुवारपासून तपासणी मोहीम हाती घेतली आहे. स्कूलबस तपासणीला सकाळपासूनच सुरुवात करण्यात आली.
यात फिटनेस प्रमाणपत्र नसणे, क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसवणे, अग्निशमन यंत्रणा व आपत्कालीन दरवाजांची अनुपलब्धता, तसेच चालकांकडे आवश्यक परवाने नसणे आदींप्रकरणी तपासणी करून अपूर्ण कागदपत्रे असणाऱ्या स्कूलबसवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पहिल्याच दिवशी १२ स्कूलबसवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.