

Municipality slaps property tax arrears
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: एस.आय. आर. च्या कामामुळे काही दिवस मंदावलेली महापालिकेची मालमत्ता कर वसुली गुरुवारी (दि.३) पुन्हा वेगाने सुरू झाली. मोठ्या थकबाकीदारांविरोधात झोननिहाय कारवाई करत मनपाच्या पथकांनी तब्बल ११ मालमत्ता सील केल्या. या कारवाईसोबतच दिवसभरात सुमारे ४० लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात आला.
महापालिकेच्या झोन कार्यालयांतील यंत्रणा एस.आय.आर.च्या कामासाठी व्यस्त होती. त्यामुळे मागील काही दिवस मालमत्ता कर वसुलीची कारवाई संथ झाली होती. मात्र, आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानंतर गुरुवारी कर विभागाने पुन्हा थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला. अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे आणि उपायुक्त (कर निर्धारक व संकलक) विकास नवाळे यांच्या सूचनेनुसार विविध झोनमधील पथकांनी मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली.
यात झोन १ मध्ये तीन मालमत्ता सील करून २.५६ लाख रुपयांचा कर वसूल करण्यात आला. तर झोन २ मध्येही तीन मालमत्ता सील करत ३.०६ लाख रुपयांची वसुली झाली. झोन ४ मध्ये तीन, झोन ६ मध्ये दोन, तर झोन ७ आणि झोन ९ मध्ये प्रत्येकी एका मालमत्तेवर सीलची कारवाई करण्यात आली. तसेच झोन ९ मधील कारवाईत २.०१ लाख रुपयांचा कर वसूल झाला.
दरम्यान, थकबाकीदारांविरोधातील ही मोहीम आता नियमितपणे राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार दर गुरुवार आणि शुक्रवारी विविध झोनमध्ये जप्तीची कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांनी थकीत कराचा भरणा करून जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन आयुक्त अमोल येडगे यांनी केले.