

This year, traditional forms including Bal Ganesha are preferred
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच शहरातील गणेशमूर्ती बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी गणेशभक्तांकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. यंदा पारंपरिकतेला आधुनिक कल्पकतेची जोड देत विविध आकर्षक रूपांतील गणेशमूर्ती साकारण्यात आल्या आहेत. विशेषतः बालगणेश, महादेवरूपी गणेश, चंद्रावर विराजमान गणेश, ऋषीरूपी गणेश यांसह विविध कलात्मक मूर्ती यंदाच्या गणेशोत्सवाचे आकर्षण ठरणार असल्याची माहिती मूर्तिकार बी.एस. जवळीकर यांनी दिली.
गणेशमूर्तिकारांनी यंदा केवळ आकार आणि रंगांमध्येच नव्हे, तर मूर्तीच्या संकल्पनेतही वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न केला आहे. लहान मुलांच्या रूपातील निरागस आणि आकर्षक बालगणेशा मूर्तीना विशेष मागणी राहण्याची शक्यता आहे. त्यासोबतच महादेवाच्या रूपातील गणेशमूर्ती, चंद्रावर बसलेला गणपती, ऋषीच्या वेशातील गणराय अशा कल्पक मूर्ती भक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत. यंदा पारंपरिक वाद्यांसोबत गणरायाची सांगड घालण्यात आली आहे. टाळ, मृदंग, बासरी आणि वीणा हातात घेतलेल्या गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या आहेत.
वारकरी परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या संत तुकारामांच्या स्वरूपातील गणेशमूर्तीही साकारण्यात आल्या आहेत. त्यामुळे भक्तांना आपल्या आवडीनुसार तसेच घरातील सजावटीला अनुरूप अशी गणेशमूर्ती निवडण्याचे विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. गणेशमूर्तिकारांकडून या मूर्ती तयार करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मेहनत घेतली जात आहे.
मूर्तीचा प्रत्येक भाग आकर्षक दिसावा, चेहऱ्यावरील भाव जिवंत वाटावेत, मुकुट, दागिने, वस्त्र आणि हातातील वाद्यांची रचना बारकाईने करता यावी यासाठी कारागीर विशेष काळजी घेत आहेत. पारंपरिक पद्धतीने मूर्ती तयार करण्यासोबतच बदलत्या मागणीनुसार नवनवीन संकल्पना साकारण्यावरही भर दिला जात आहे.