

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या प्रक्रियेला आता गती येण्याची शक्यता आहे. प्रभाग रचनेच्या कार्यक्रमानुसार येत्या शुक्रवारी (दि. २२) आराखडा प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यादृष्टीने यंत्रणाही कामाला लागली आहे. परंतु, नागरिकांना केवळ सात दिवसांतच सूचना, हरकती नोंदविता येणार आहे.
राज्य शासन आणि निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या तयारीचा पहिला आणि महत्त्वाचा भाग म्हणजे प्रभाग रचनेचा आराखडा हा आहे. शासनाने छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुका प्रभाग रचनेनुसार घेण्याचा निर्णय केला आहे.
चार वॉर्डाचा एक प्रभाग असेल असे स्पष्ट करण्यात आले. शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार छत्रपती संभाजीनगर महापालिकेने प्रभाग रचनेचा आराखडा तयार करून तो ७ ऑगस्टला शासनाच्या नगर विकास विभागाला करण्यात आला. या आराखड्याची शासनाकडून छाननी करून त्याची तपासणी करण्यात आली. यात काही त्रुट्या काढण्यात आल्या असून त्याची दुरुस्तीदेखील शासनस्तरावर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, या आराखड्यात लागेबांधे जपल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.
आराखड्यानुसार छत्रपती संभाजीनगरात २८ प्रभाग चार वॉर्डाचे करण्यात आले आहेत, तर एक प्रभाग तीन वॉर्डाचा करण्यात आला आहे. एकूण २९ प्रभाग तयार करण्यात आले आहेत.
अजूनही आरक्षणाच्या सूचना नाहीच महापालिकेने तयार केलेला प्रभाग रचनेचा आराखडा शासनाला सादर केला आहे. तर शासनाकडून लवकरच तो आयोगाला सादर केला जाणार असून आयोगाच्या मंजुरीनंतर आराखडा हरकती, सूचनांसाठी प्रसिद्ध केला जाणार आहे. परंतु, अजूनही प्रभागांमधील वॉर्डाच्या आरक्षणाबद्दल राज्य शासन किंवा निवडणूक आयोगाकडून महापालिकेला कोणत्याही सूचना प्राप्त नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.