

Municipal Council Election: As many as 229 nominations filed for 28 seats
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : सिल्लोड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत राजकीय वातावरण तापले असून, नगराध्यक्ष पदासाठी तब्बल १७ उमेदवारी अर्ज, तर १४ प्रभागांतील २८ जागांसाठी तब्बल २२९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तहसील कार्यालय परिसरात अभूतपूर्व गर्दी उसळली. थेट जनतेतून निवडल्या जाणाऱ्या नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे माजी नगराध्यक्ष बनेखा पठाण, भाजपा उमेदवार मनोज मोरेलू, शिवसेना उबाठा गटाचे लखन ठाकूर, दीपक धाडगे, मच्छिद्र धाडगे, बसपाचे राजीव रोजेकर आदींसह १७ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
राज्यातील आणि केंद्रातील सत्तास्थानी असलेल्या भाजपा-शिवसेना शिंदे-अजित पवार राष्ट्रवादी युतीचा सिल्लोडमध्ये फज्जा उडाला असून, मित्रपक्षच एकमेकांविरोधात उभे ठाकल्यामुळे स्थानिक राजकारणात नवेच समीकरण निर्माण झाले आहे. त्यात महाविकास आघाडीचीही नगराध्यक्षपदासाठी उमेदवार घोषित करण्याची चर्चा रंगली होती; मात्र ऐनवेळी काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) यांनी पाऊल मागे घेतल्याने मशिवसेना उबाठाफगटाने तीन उमेदवारांना एबी फॉर्म देत रंगत अधिकच वाढवली.