

Subordinate Minerals Department could not get a full-time officer
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा खनिकर्म अधिकारीसारखे महत्त्वाचे पद गेल्या पाच महिन्यांपासून रिक्त आहे. शासनाने पूर्णवेळ अधिकारी नियुक्त न केल्यामुळे या विभागाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्याकडून हाकला जात आहे. याआधी या पदाची जबाबदारी अनिल घनसावंत यांच्याकडे देण्यात आली आहे. आता तहसीलदार दिशेन झांपले यांच्याकडे हा प्रभारी पदभार सोपविण्यात आला आहे.
जिल्ह्यातील गौण खनिजाच्या चोरीला आळा घालण्याचे आणि अधिकृत गौण खनिज उत्खननावरील महसूल जमा करण्याचे काम जिल्हा खणीकर्म अधिकारी कार्यालयाकडून केले जाते. जिल्ह्यातील ९ तालुक्यांतर्गत वाळू पट्टे व गौण खनिजाची मोठ्या प्रमाणावर विनापरवाना वाहतूक होते. यंदा अद्यापपर्यंत वाळूपट्ट्यांचे लिलाव झालेले नाहीत.
तरीही जिल्ह्यात सर्रास वाळूची वाहतूक आणि विक्री सुरू आहे. त्यात गेल्या पाच महिन्यांपासून जिल्हा खनिकर्म अधिकारी पद रिक्त आहे. शासनाने आधीचे जिल्हा खनिकर्म अधिकारी किशोर घोडके यांची जून महिन्यात बदली केली. मात्र तेव्हापासून या पदावर नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या पदाचा अतिरिक्त पदभार नायब तहसीलदार अनिल घनसावंत यांच्याकडे सोपविला होता. आता तो बदलून तहसीलदार दिशेन झांपले यांच्याकडे सोपविला आहे. दरम्यान, पूर्णवेळ अधिकारी नसल्यामुळे या विभागाच्या कारवाया थंडावल्या आहेत. दुसरीकडे वाळू आणि इतर गौण खनिजाची चोरी मोठ्या प्रमाणावर होत आहे.
दहा वाळूघाटांचा गुरुवारी लिलाव
जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील दहा वाळूघाटांचा येत्या २० नोव्हेंबर रोजी लिलाव होणार आहे. या वाळू घाटांमधून संबंधित ठेकेदारांना पुढील वर्षभर वाळू उपसा करता येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात अधिकृत वाळू विक्री सुरू होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकही वाळूघाट सुरू नाही. त्यामुळे अनधिकृत पद्धतीने तसेच इतर जिल्ह्यातून शहरात वाळू आणून विकली जात आहे. परिणामी वाळूचे भाव अवाक्याबाहेर गेले आहेत. पैठण, फुलंब्री, गंगापूर, वैजापूर आणि सिल्लोड तालुक्यातील हे वाळूघाट आहेत. यामध्ये वानेगाव खु. बु., हिरडपुरी, झोलेगाव, बाभूळगाव गंगा, पेंडापूर, भालगाव, आगाठाण, केऱ्हाळा, भवन-चिंचखेडा आणि उपळी येथील वाळूघाटांचा समावेश आहे.