

Municipal Corporation's Digital Formula for Tax Collection
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मालमत्ता कर थकविण्याऱ्यासाठी महापालिकेने डिजिटल फॉर्म्युला वापरत वसुली मोहिमेला वेग दिला आहे. श्रीमित्रा अॅपच्या मदतीने थकीत मालमत्तांची अचूक माहिती उपलब्ध होत असल्याने कर विभागाने मे महिन्यात आतापर्यंत मालमत्ताधारकांवर प्रत्यक्ष धडक दिली आहे. यासोबतच सातारा-देवळाई आणि कांचनवाडी-नक्षत्रवाडी परिसरात राबविलेल्या विशेष मोहिमेत एक हजाराहून अधिक नव्या मालमत्तांची नोंद करून त्यांना कराच्या कक्षेत आणण्यात आले आहे.
तब्बल १२ हजार महापालिकेच्या नोंदीनुसार शहरात सुमारे ३ लाख २० हजार मालमत्ता आहेत. मात्र आर्थिक वर्ष संपेपर्यंत केवळ दीड लाख मालमत्ताधारकांनीच कराचा भरणा केला होता. त्यामुळे उर्वरित १ लाख ७० हजार मालमत्तांवर थकबाकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच काहींनी मागील एक-दोन वर्षांपासून कर भरलेला नाही. अनेक मालमत्ताधारक चार-पाच वर्षांपासून कर भरण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यावरून महापालिकेच्या महसुलात वाढ करण्यासाठी आयुक्त अमोल येडगे यांनी थकबाकीदारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले.
त्यानंतर प्रशासनाकडून झोननिहाय स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांना श्रीमित्रा अॅपचे टॅब देण्यात आले आहेत. त्यामुळे वसुली कर्मचाऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या प्रत्यक्ष भेटी, दैनंदिन अहवाल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणारे सततचे मॉनिटरिंगने मोहिमेला गती मिळाली आहे. दरम्यान, श्रीमित्रा अॅपमध्ये प्रत्येक मालमत्तेची करस्थिती, थकबाकी, कर आकारणी व मालमत्तेची संपूर्ण माहिती उपलब्ध होत असल्याने कर विभागाला नियोजनबद्ध कारवाई करणे शक्य झाले आहे.
पूर्वी कर विभागाच्या नजरेतून सुटलेल्या अनेक मालमत्ता आता प्रशासनाच्या रडारवर आल्या आहेत. दरम्यान, डिजीटल मालमत्ता कर फार्मुल्यामुळे मालमत्ताधारकांना कर भरण्यसाठी रांग लावावी लागणार नाही. यामुळे त्यांचा वेळ वाचणार आहे. डिजीटल कर भरणामुळे तातडीने कर भरण्याची पावती मिळण्यासाठी सोय होणार आहे. मालमत्ताधारकाना घरबसल्या आपली थकबाकी किती आहे याची पाहणी करून ती ऑनलाईनच भरता येणार असल्याने एकप्रकरे कर भरणा करणाऱ्याना दिलासा असल्याचे बोलले जात आहे. मनपाकडून माझा कर माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत मे महिन्यात तीन हजारांहून अधिक नव्या मालमत्तांची कर नोंदणी करण्यात आली असून, मोठ्या प्रमाणात थकबाकीदारांशी थेट संपर्क साधण्यात आला असल्याचे उपायुक्त विकास नवाळे यांनी सांगितले.
तीन दिवसांत १०३२ नव्या मालमत्तांना कर
सातारा-देवळाई (झोन ८) तसेच कांचनवाडी-नक्षत्रवाडी (झोन १०) भागात २० ते २२ मेदरम्यान विशेष सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत कर नोंदणीबाहेर असलेल्या १०३२ मालमत्तांचे मोजमाप करून त्यांना प्रथमच कर आकारणी करण्यात आली. संबंधित मालमत्तांच्या नावाने कर पावत्या तयार करण्यात आल्या असून, अनेकांनी तातडीने कर भरणाही केला आहे.
न विकलेल्या फ्लॅटचा कर आता बिल्डरांकडून
शहरातील अनेक गृहप्रकल्पांमध्ये बांधकाम पूर्ण होऊन भोगवटा प्रमाणपत्र घेण्यात आले असले तरी काही फ्लॅट्सची विक्री झालेली नाही. अशा मालमत्तांवरील थकीत कर संबंधित बिल्डरांकडून वसूल करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. या निर्णयामुळे कर वसुलीत मोठी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.